पाणीपुरवठा योजनांचा आराखडा तातडीने तयार करा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:27 IST2021-07-21T04:27:01+5:302021-07-21T04:27:01+5:30
वाशिम : जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठा योजनांचा आराखडा तयार करण्याची कार्यवाही अधिक गतीने करावी. या आराखड्यांना लवकरात लवकर ...

पाणीपुरवठा योजनांचा आराखडा तातडीने तयार करा !
वाशिम : जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठा योजनांचा आराखडा तयार करण्याची कार्यवाही अधिक गतीने करावी. या आराखड्यांना लवकरात लवकर प्रशासकीय मान्यता घेऊन कामे सुरू करण्याच्या अनुषंगाने सूक्ष्म नियोजन करावे, अशा सूचना पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी जलजीवन मिशनचा आढावा घेताना संबंधित यंत्रणेला दिल्या.
ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घराला नळजोडणीद्वारे शुद्ध व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी जलजीवन मिशन राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात जलजीवन मिशनअंतर्गत करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा पालकमंत्री देसाई यांनी १९ जुलै रोजी आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, खासदार भावना गवळी, आमदार सर्वश्री गोपीकिशन बाजोरिया, किरणराव सरनाईक, राजेंद्र पाटणी यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. जिल्ह्यात राष्ट्रीय पेयजल योजनेच्या पहिल्या टप्प्यात सुरू असलेली पाणी पुरवठा योजनांची कामे डिसेंबरअखेरपर्यंत पूर्ण करावीत. तसेच जलजीवन मिशनमध्ये समाविष्ट गावांसाठी पाणीपुरवठा योजनांचा आराखडा तयार करण्याची कार्यवाही अधिक गतीने करण्याच्या सूचना ना. देसाई यांनी दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी जलजीवन मिशनच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
०००००
पाणीपुरवठा योजनेपासून गावे वंचित राहू नये!
एकही गाव पाणीपुरवठा योजनेपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच थकबाकीमुळे बंद पडलेल्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींशी समन्वय साधून आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचनाही पालकमंत्री देसाई यांनी दिल्या.