लोकप्रतिनिधींचे एकमेकांवरील आरोपांचे खंडन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:25 IST2021-02-05T09:25:02+5:302021-02-05T09:25:02+5:30
खासदार भावना गवळी यांनी प्रजासत्ताकदिनी घडलेला वृत्तांत पत्रकार परिषदेत मांडताना सांगितले की, थांबलेली गुंठेवारीची कामे आणि खरेदी प्रक्रियेच्या मुद्यावर ...

लोकप्रतिनिधींचे एकमेकांवरील आरोपांचे खंडन!
खासदार भावना गवळी यांनी प्रजासत्ताकदिनी घडलेला वृत्तांत पत्रकार परिषदेत मांडताना सांगितले की, थांबलेली गुंठेवारीची कामे आणि खरेदी प्रक्रियेच्या मुद्यावर शेतकरी व अन्य काही नागरिकांशी चर्चा करत असताना आमदार पाटणी यांनी त्याठिकाणी येऊन नाहक वाद घातला. त्यानंतर ४ तास जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बसून बाहेर आल्यानंतर त्यांनी वाशिम शहर बंद करण्याचा घाट घातला. हा प्रकार चुकीचा आहे. जे.पी. कन्स्ट्रक्शन कंपनीने वाशिममध्ये केलेली अनेक कामे चुकीच्या पद्धतीने झालेली आहेत. जुनी आययूडीपी कॉलनी परिसरातील खासगी मालकीच्या योगभूमीच्या जमिनीवर झालेल्या विकास कामांवर बराचसा निधी शासकीय तिजोरीतून खर्च झालेला आहे. वाशिम शहरात अनेक कॉम्प्लेक्स अनधिकृत बांधण्यात आलेले आहेत. या सर्व प्रकरणांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करून चौकशी लावणार असल्याचे भावना गवळी यांनी सांगितले. माझ्यावर करण्यात आलेले आरोप धादांत खोटे असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या.
दरम्यान, आमदार पाटणी यांनीही पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले. ते म्हणाले की, प्रजासत्ताकदिनी झालेल्या वादादरम्यान गुंठेवारी किंवा खरेदी प्रक्रियेचा कुठलाच विषय समोर आला नाही किंवा त्याठिकाणी कोणी शेतकरीही उपस्थित नव्हता. असे असताना माझ्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल करून खासदारांना अर्वाच्च भाषेत बोललो, दमदाटी केली, अशा प्रकारचे करण्यात आलेले आरोप पूर्णत: चुकीचे आहेत. याउलट खासदार गवळींनी आपल्यासोबत बोलताना एकेरी भाषेचा वापर केला. आपण महिला खासदार असल्याने अशी भाषा शोभत नसल्याचे सांगितले असता, तुला बघून घेईल, असे त्या म्हणाल्या. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांमधून एक जण आपल्या अंगावर आला. माझ्या सुरक्षा रक्षकाने त्याला रोखले. एवढे होऊनही गावाच्या विकासासाठी बैठक असल्याने त्याठिकाणी थांबलो. लोकशाहीच्या मार्गाने होणाऱ्या विकासकामाला आपला विरोध असल्याचा प्रश्नच नाही. गलिच्छ राजकारण मी कधीच केले नाही. त्यामुळे आपणाविरुद्ध पोलिसांत दाखल केलेली तक्रार पूर्णत: खोटी असल्याचे ते म्हणाले. आमदार लखन मलिक, राजू पाटील राजे यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले.