मेहकरात रस्त्यावर खड्डे
By Admin | Updated: July 25, 2014 00:09 IST2014-07-25T00:09:44+5:302014-07-25T00:09:44+5:30
मनसेचे अभिनव आंदोलन

मेहकरात रस्त्यावर खड्डे
मेहकर : सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत शहरातील मुख्य रस्ता व बसस्टँड परिसरात मोठमोठे खड्डे पडले असून, आजच्या दमदार पावसाने या खड्डयांना स्विमिंग पुलाचे स्वरुप प्राप्त झाले. दरम्यान बुधवारला मेहकर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने या स्विमिंगपुलरुपी खड्डयात पोहण्याचे अभिनव आंदोलन करण्यात आले. यासंदर्भात मेहकर शहरातील सामाजिक बांधकाम विभागाच्या अख्त्यारीत असलेल्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. यामध्ये शाळकरी विद्यार्थी, दुचाकीधारक, विविध वाहने यासह परिसरातील नागरिकांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या बाबीची गंभीर दखल घेत मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या नेतृत्वात आज बुधवारला मनसे कार्यकर्त्यांंनी स्विमिंगपुलरुपी खड्डयात साचलेल्या पाण्यात पोहण्याचे अभिनव आंदोलन केले. २0१२ ते २0१४ दरम्यानच्या कालावधी सामाजिक बांधकाम विभागाने शहरातील मुख्य रस्त्यावर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती केली नाही. यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस असतांनाही या रस्त्यांची खड्डयांमुळे पार दुरावस्था झालेली आहे. तरी सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने रस्त्यावरील खड्डे बुजवावेत अन्यथा मनसेच्यावतीने आणखी तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही लक्ष्मण जाधव यांनी दिला आहे. आजच्या अभिनव आंदोलनात मनसेचे लक्ष्मण जाधव, सुधिर रायते, संतोष अंभोरे, बाळू दळवी, विशाल तळणीकर, राजू देव्हडे, लहुराज मानघाले, संतोष सदार, सुमित तळणीकर, शुभम दुतोंडे, लखन दुतोंडे, आकाश बाजड, भिमा सरदार, सुनिल चंदनशिव, राम इंगोले यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.