कोंडोली परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST2021-08-17T04:47:39+5:302021-08-17T04:47:39+5:30
कोंडोली येथील शेतकरी भाऊराव भवाड यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक अचानक सुकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी काही ...

कोंडोली परिसरात सोयाबीन पिकावर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव
कोंडोली येथील शेतकरी भाऊराव भवाड यांच्या शेतातील सोयाबीनचे पीक अचानक सुकत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी काही झाडे उपटून पाहिली असता झाडांच्या खाली मुळांना अळ्या लागल्या असल्याचे आढळून आले. भवाड यांनी वेळेत शेतीची मशागत करून वेळेवर पेरणीसुद्धा केली, डवरणी, निंदण, खुरपण आणि फवारणीही त्यांनी केली परंतु पिकाच्या मुळाशी अळ्या पहिल्याच वेळी दिसल्याने आता या अळ्यांचे नियंत्रण कसे करावे आणि पीक वाचवावे, कसे असा प्रश्न त्यांना पडला आहे. त्यांनी गावातील गजानन कोटलवार यांना माहिती देऊन कृषी सहाय्यक महिंद्रे याच्याशी संपर्क साधून या प्रकाराची कल्पना दिली. दरम्यान, परिसरात इतरही काही शेतकऱ्यांच्या शेतात असा प्रकार घडत असून, या रोगाची पाहणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकारी व कृषी शास्त्रज्ञ कोंडाेली शिवारात येणार असल्याचे कृषी सहाय्यक महिंद्रे यांनी सांगितले.
०००००००००००००००००००००००
कृषी विभागाकडून पाहणीची मागणी
कोंडोली परिसरात अज्ञात रोगाच्या प्रादुर्भावामुळे सोयाबीनचे पीक सुकत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. कृषी सहाय्यकाला माहिती दिल्यानंतरही अद्याप कृषी विभागाचे अधिकारी किंवा शास्त्रज्ञ येथे पीक पाहणीसाठी आले नाहीत. वरिष्ठांनी याची तातडीने दखल घेऊन कृषी विभागाच्या पथकाकडून येथे पाहणी करण्याची मागणी केली आहे.