कोरोनाचा उद्रेक होऊनही गांभीर्य नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 04:36 IST2021-04-05T04:36:52+5:302021-04-05T04:36:52+5:30
गतवर्षी कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनाने सक्तीचा लॉकडाऊन लावला. यामुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे ठप्प झाले. अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. ...

कोरोनाचा उद्रेक होऊनही गांभीर्य नाही
गतवर्षी कोरोनावर नियंत्रण मिळविण्याकरिता शासनाने सक्तीचा लॉकडाऊन लावला. यामुळे अनेकांचे रोजगार गेले, उद्योगधंदे ठप्प झाले. अनेकांवर उपासमारीची वेळ ओढवली. त्यामुळे आता सर्वांनाच लॉकडाऊन नको आहे. असे असले तरी सार्वजनिक ठिकाणी मात्र बिनधास्तपणे गर्दी होत आहे. रविवारी शहरातील बाजारपेठ, किराणा बाजार, शासकीय कार्यालये, बस स्टँड, रेल्वे स्टेशन येथे झालेल्या गर्दीत ‘फिजिकल डिस्टन्सिंग’चा पुरता बोजवारा उडाल्याचे दिसून आले. कोरोनाची लस आल्यावर संसर्गाचा प्रादुर्भाव संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती; परंतु नागरिकांची बेफिकिरी कोरोना वाढीस कारणीभूत ठरत आहे. जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले. या काळात काळजी घेण्याची गरज असताना जनता कुठलेही सोयरसुतक नसल्यासारखे वागत आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्यावरही सर्वत्र तोबा गर्दी झाल्याचे पहावयास मिळाले.
..........................
--बॉक्स--
भाजी बाजार की कोरोनाचा ‘बाजार’
वाशिम शहरातील भाजी बाजारात रविवार असल्याने भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यावेळी अनेक नागरिकांच्या चेहऱ्यावर मास्क नव्हते. बहुतांश विक्रेत्यांनीही मास्क घातलेले नव्हते, सोशल डिस्टन्सिंग नाही या परिस्थितीमुळे हा भाजी बाजार? आहे की, कोरोनाचा बाजार? असा प्रश्न पडला होता.
--बॉक्स--
बस स्थानकावर शेकडोंचा एकमेकांशी संपर्क
शहरातील बसस्थानकांतून दरदिवशी ५० पेक्षा अधिक बसगाड्या परजिल्ह्यात ये-जा करतात या बसगाड्यांद्वारे शेकडो प्रवासी प्रवास करतात. येथे सर्वाधिक काळजी घेणे गरजेचे आहे; मात्र महामंडळाची सक्ती प्रवाशांच्या पत्थ्यावर पडताना दिसून येत नाही. बसमध्ये जागा मिळविण्यासाठी प्रवाशी एकच धूम ठोकत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे.
--बॉक्स--
ऑटो चालकांनाही मास्कचा विसर
नो मास्क, नो सवारी ही मोहीम राबविणाऱ्या ऑटो चालकांचा स्वत:चा मास्क आता हनुवटीवर आला आहे. त्यात ना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होते ना मास्क लावला जातो.
--बॉक्स--
--बॉक्स--
मास्क हेच हत्यार, तरीही फिरताय विनामास्क
शहरात काही काम नसताना नागरिक पायी व वाहने घेऊन फिरताना आढळून येत आहे. या काळात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तोंडावर मास्क गरजेचा आहे; मात्र नागरिक विनामास्क फिरत आहेत.
--बॉक्स--
किराणा बाजार, वाढवितोय आजार!
शहरातील किराणा बाजारात दररोज वर्दळ असते. जीवनावश्यक वस्तूंमध्ये किराणा समाविष्ट असल्याने या दुकानांना लॉकडाऊनमध्येही सूट मिळते. या ठिकाणीच कोविड नियमांचे पालन होत नाही. भाजी बाजाराप्रमाणे येथेही नागरिक गर्दी करत आहे. एक छोट्या दुकानासमोर सहा-सात ग्राहक ‘फिजीकल डिस्टन्सिंग’ न पाळता उभे राहतात.