धामणी ग्रामपंचायतच्या चौकशीचे आदेश
By Admin | Updated: April 20, 2015 01:56 IST2015-04-20T01:56:33+5:302015-04-20T01:56:33+5:30
मानोरा तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी ; १६ एप्रिलपासून चौकशी सुरू झाल्याची माहिती.

धामणी ग्रामपंचायतच्या चौकशीचे आदेश
वाशिम : मानोरा तालुक्यातील धामणी ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करण्याचे आदेश जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी ८ एप्रिल रोजी काढल्याने, मानोरा गटविकास अधिकार्यांमार्फत १६ एप्रिलपासून चौकशी सुरू झाल्याची माहिती आहे. पंचायतीचा ठराव न घेता मालकी हक्काची नोंद करणे तसेच पंचायतला विश्वासात न घेता बांधकाम परवानगी देणे व धामणी ग्रामपंचायतच्या इतर कामकाजाची चौकशी करण्याची मागणी मंगला भगत व इतर तीन ग्रामपंचायत सदस्यांनी मानोरा पंचायत समितीकडे २३ एप्रिल २0१४ रोजी केली होती. यानुसार मानोरा गटविकास अधिकार्यांनी तक्रारीची शहानिशा केली असता, मालकी हक्काची नोंद कुठल्या ठरावानुसार व तारखेत देण्यात आली याबाबत ग्रामपंचायत दप्तरी दस्तऐवज उपलब्ध नसल्याचे तसेच पंचायतीचा ठराव न घेता मालकी हक्काची नोंद करणे, पंचायतीस विश्वासात न घेता बांधकामाची परवानगी देणे आदी प्रकरणी तत्कालीन सचिव व सरपंचांवर गटविकास अधिकार्यांनी ठपका ठेवला होता. सदर प्रकरण जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत तसेच जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांच्या दालनात पोचले होते. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतल्यानंतर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंशी यांनी सखोल चौकशीचे आदेश ८ एप्रिल रोजी दिले. ग्रामपंचायत धामणी येथील नमुना ८ रजिस्टरला बोगस व खोट्या नोंदी घेण्यात आल्याची सखोल चौकशी करणे, जमा-खर्चाची चौकशी जि.प. वाशिम स्तरावरून पूर्ण होईपर्यंंंंत ग्रामपंचायतच्या रेकॉर्डमध्ये कोणत्याही नवीन नोंदी न करणे तसेच ग्रामपंचायतच्या खात्यामधून कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार किंवा खर्च न करणे आदी निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी रुचेश जयवंशी यांनी ८ एप्रिल २0१५ रोजी मानोरा पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्यांना दिले आहेत. यानुसार गटविकास अधिकार्यांनी चौकशी सुरू केली आहे.