पानपट्ट्या, चहा टपऱ्या, स्नॅक्स हॉटेल बंद ठेवण्याचा आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 18:06 IST2020-03-20T18:06:24+5:302020-03-20T18:06:33+5:30
राज्यात १३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-१८९७ लागू करण्यात आला आहे.

पानपट्ट्या, चहा टपऱ्या, स्नॅक्स हॉटेल बंद ठेवण्याचा आदेश
वाशिम : कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या, चहा टपऱ्या व स्नॅक्स हॉटेल्स बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २० मार्च रोजी दिला.
कोरोना विषाणूचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात १३ मार्चपासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा-१८९७ लागू करण्यात आला आहे. तसेच या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध प्रतिबंधात्मक उपाय करण्यात येत आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी एकाच ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी टाळणे आवश्यक असून त्यादृष्टीने उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व पान टपऱ्या, चहा टपऱ्या व स्नॅक्स हॉटेल्स २० मार्च ते ३१ मार्च २०२० या कालावधीत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. किराणा दुकाने, दुध अथवा दुग्धोत्पादने, फळे व भाजीपाला, मेडिकल, जीवनावश्यक वस्तू यांची विक्री गर्दी टाळून करावी. कोणत्याही व्यक्तीने या आदेशांचे उल्लंघन केल्यास ते भारतीय दंडसंहिता (४५ ऑफ १८६०) च्या कलम १८८ नुसार दंडनीय, कायदेशीर कारवाईस तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा-२००५ व साथरोग प्रतिबंध कायदा-१८९७ कलम २ अन्वये तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.