विरोधी पक्षनेते बांधावर; पीक परिस्थिती शासनदरबारी मांडणार!
By संतोष वानखडे | Updated: September 6, 2023 15:58 IST2023-09-06T15:57:58+5:302023-09-06T15:58:47+5:30
शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही विजय वडेट्टीवार यांनी दिली.

विरोधी पक्षनेते बांधावर; पीक परिस्थिती शासनदरबारी मांडणार!
संतोष वानखडे, वाशिम : विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास जिल्ह्यात शेतीच्या बांधावर पोहोचून पीक परिस्थितीची पाहणी केली. पावसाचा दीर्घ खंड पडल्याने अनेक भागात पीक परिस्थिती भयावह असून शेतकऱ्यांना भरपाई मिळावी म्हणून शासनदरबारी पाठपुरावा करण्याची ग्वाही वडेट्टीवार यांनी दिली.
पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्याने हलक्या प्रतीच्या शेतातील पिके माना टाकत आहेत. जमिनीला भेगा पडत आहेत. अशा भयावह परिस्थितीत पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांना निकषानुसार भरपाई मिळणे अपेक्षीत आहे. जिल्ह्यातील पीक परिस्थितीची पाहणी करण्यासाठी विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी ६ सप्टेंबर रोजी सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास केनवड (ता.रिसोड) गाठले. आमदार अमित झनक यांच्यासह शेतकऱ्यांना सोबत घेवून सोयाबीन पिकाची पाहणी केली. पावसाअभावी पिके कोमेजून जात असल्याने शेतकऱ्यांना भरपाई मिळावी यासाठी शासनदरबारी हा प्रश्न पोहोचविण्याची ग्वाही यावेळी वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांना दिली.