पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी उरले केवळ पाच दिवस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST2021-07-11T04:27:12+5:302021-07-11T04:27:12+5:30

वाशिम जिल्ह्यातील ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आहे. पीक विमा हप्ता ...

Only five days left to participate in crop insurance scheme | पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी उरले केवळ पाच दिवस

पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी उरले केवळ पाच दिवस

वाशिम जिल्ह्यातील ज्वारी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस या पिकांचा समावेश प्रधानमंत्री पीक विमा योजनेत आहे. पीक विमा हप्ता भरून या योजनेत सहभागी होण्यासाठी आता केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिला असून, जिल्ह्यातील जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे. वाशिम जिल्ह्यात सन २०२१-२२ खरीप हंगामाकरिता प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्याकरिता रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडसोबत करार झालेला आहे. खरीप हंगामामध्ये जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात समाधानकारक पाऊस झाला असल्याने खरीप पेरणीला चांगल्या प्रकारे सुरुवात होऊन उगवण समाधानकारक झाली. परंतु, जून महिन्‍याच्या २९ तारखेपासून पावसाने खंड दिल्यामुळे उशिरा पेरलेल्या पिकांच्या उगवणीवर व पहिल्या टप्प्यात पेरलेल्या पिकांच्या वाढीवर परिणाम दिसून आला. भविष्या‍मध्ये या पिकांच्या उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. भविष्यामध्ये येणारे निसर्गातील चढ-उतार, कमी-अधिक पाऊस या सर्व बाबींपासून पिकांना संरक्षण मिळण्यासाठी पीक विमा योजनेचा लाभ हा निश्चित दिलासा देणारा होऊ शकतो. या योजनेमध्ये सहभाग घेतल्यानंतर पिकास दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, कीड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, वीज कोसळणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या पीक नुकसानीस संरक्षण मिळणार आहे.

-------

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीत नुकसानीचे व्यापक विमा संरक्षण

खरीप हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे झालेले नुकसान म्हणजेच पीक काढणीच्या १५ दिवस आधीपर्यंत पूर, पावसातील खंड, दुष्काळ इ. बाबींमुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षित उत्पादनामध्ये सरासरी उत्पादनाच्या ५० टक्केपेक्षा जास्त घट अपेक्षित असेल तर विमा संरक्षण देय राहील. पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत दुष्काळ, पावसातील खंड, पूर, क्षेत्र जलमय होणे, कीड व रोगाचा व्यापक प्रादुर्भाव, भूस्खलन, नैसर्गिक आग, वीज कोसळणे, वादळ, गारपीट आणि चक्रीवादळ यासारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण दिले जाईल. स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत गारपीट, भूस्खलन, विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, ढगफुटी, वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यामुळे होणारे अधिसूचित पिकाचे ठरावीक क्षेत्रातील नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निश्चित करण्यात येईल. काढणीपश्चात नुकसानीमध्ये ज्या पिकांची काढणीनंतर शेतात पसरवून अथवा पेंढ्या बांधून सुकवणी करणे आवश्यक असते अशा कापणी, काढणीनंतर सुकवणीसाठी शेतात पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकाचे काढणीनंतर दोन आठवड्यांच्या आत (१४ दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे आलेला पाऊस आणि बिगरमोसमी पावसामुळे नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून निकषांचे अधिन राहून नुकसानभरपाई निश्चित केली जाईल.

--------

जिल्ह्यात खरीप हंगामात घेण्यात येणाऱ्या सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद व खरीप ज्वारी या पिकांचा प्रधानमंत्री पीक विमा योजनेत समावेश असून, ही योजना जिल्ह्यातील सर्व मंडळांना लागू आहे. योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १५ जुलै २०२१ आहे. तरी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी नजीकच्या सामूहिक सुविधा केंद्र (सीएससी) अथवा बँकेत जाऊन विमा हप्ता भरावा. या काळात सामूहिक सेवा केंद्र रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी विमा कंपनीचे जिल्हा व तालुका प्रतिनिधी, बँक अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांच्याशी संपर्क साधावा.

- शंकरराव ताेटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

Web Title: Only five days left to participate in crop insurance scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.