आठवी ते बारावीच्या केवळ ३० टक्के शाळा सुरू!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:43 IST2021-07-30T04:43:33+5:302021-07-30T04:43:33+5:30

जिल्ह्यात ग्रामीण भागांत २७५ शाळा सुरू करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागापुढे आहे. कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आणि ...

Only 30% of 8th to 12th standard schools started! | आठवी ते बारावीच्या केवळ ३० टक्के शाळा सुरू!

आठवी ते बारावीच्या केवळ ३० टक्के शाळा सुरू!

जिल्ह्यात ग्रामीण भागांत २७५ शाळा सुरू करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागापुढे आहे. कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करण्यासाठी ग्रामपंचायतींचे प्रस्ताव आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसाठी पालकांचे संमती पत्र घेण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार मुख्याध्यापक, प्राचार्यांनी ग्रामस्तर समितीच्या सहकार्याने ग्रामपंचायतींचे प्रस्ताव तसेच पालकांचे संमतीपत्र मिळविण्यासाठी भेटी देणे सुरू केले. तथापि, २९ जुलैपर्यंत २७५ पैकी केवळ ८१ शाळाच सुरू होऊ शकल्या, तर या शाळांतील ७५,२६० विद्यार्थ्यांपैकी केवळ २,२६१ विद्यार्थ्यांची शाळांत उपस्थिती दिसून येत आहे. कोरोनामुक्त गावांतील शाळांची संख्या वाढण्यासाठी ग्रामपंचायतींनी ठरावासाठी पुढाकार घेऊन शिक्षण विभागाकडे प्रस्ताव देण्याची गरज आहे.

---------------

ग्रामीण भागांतील एकूण व सुरू झालेल्या शाळा

तालुका - शाळा - सुरू झालेल्या शाळा

कारंजा - ४५ - ३०

मालेगाव - ४४ - २२

मं.पीर - ३९ - ०७

मानोरा - ४६ - ०५

रिसोड - ५३ - १२

वाशिम - ४८ - ०५

------------------------------

वाशिम तालुक्याचे प्रमाण सर्वांत कमी

कोरोनामुक्त गावांतील शाळा सुरू करण्याबाबत जिल्ह्यात कारंजा आणि मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींचा समाधानकारक प्रतिसाद मिळत असला तरी रिसोड, मंगरुळपीर, मानोरा आणि वाशिम या चार तालुक्यांत अपेक्षित असा प्रतिसाद लाभलेला नाही. त्यात वाशिम तालुक्यात ग्रामीण भागातील ४८ शाळांपैकी केवळ ५ शाळा सुरू झाल्या असून, शाळांबाबत टक्केवारीच्या तुलनेत वाशिम तालुका जिल्ह्यात माघारला आहे.

--------------

कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावरील मानोऱ्यातही अल्प प्रतिसाद

ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. त्यात मानोरा तालुक्यात ७७ पैकी ७० ग्रामपंचायती कोरोनामुक्त झाल्या आहेत. शिवाय गेल्या दहा दिवसांत तालुक्यात केवळ ३ नवे कोरोनाबाधित आढळून आले आहेत. अर्थात हा तालुका कोरोनामुक्तीच्या उंबरठ्यावर आहे. त्यानंतरही तालुक्यात शाळा सुरू करण्याबाबत अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही.

------

कोट :

कोरोनामुक्त गावांतील आठवी ते बारावीच्या शाळांची संख्या वाढविण्यासाठी शिक्षण विभागाची धडपड सुरू आहे. आता ग्रामपंचायतीही याबाबत सकारात्मक झाल्या असून, त्यांच्या प्रस्तावांची संख्या वाढत आहे. येत्या काही दिवसांत शाळांची संख्या ५० टक्क्यांच्या वर होण्याचा विश्वास वाटतो.

- रमेश तांगडे,

शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

Web Title: Only 30% of 8th to 12th standard schools started!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.