उमेदवारी मागे कोणी घेईना; महाविकास आघाडीचे जमेना!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:16+5:302021-09-27T04:45:16+5:30
संतोष वानखडे वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीत प्रतिष्ठेच्या ठिकाणी उमेदवारी मागे कोण घेणार? हा गुंता अद्याप सुटला ...

उमेदवारी मागे कोणी घेईना; महाविकास आघाडीचे जमेना!
संतोष वानखडे
वाशिम : जिल्हा परिषद, पंचायत समिती पोटनिवडणुकीत प्रतिष्ठेच्या ठिकाणी उमेदवारी मागे कोण घेणार? हा गुंता अद्याप सुटला नसल्याने, महाविकास आघाडी होण्याची शक्यता मावळत चालली आहे. अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ सप्टेंबर असून, त्यानंतर निवडणुकीचे चित्रही स्पष्ट होणार आहे.
वाशिम जिल्हा परिषदेचे ५२ गट आणि जिल्ह्यातील सहा पंचायत समित्यांच्या १०४ गणांसाठी ७ जानेवारी २०२० रोजी निवडणूक झाली होती. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण होत असल्याने, ओबीसी प्रवर्गातील सदस्यांची पदे रद्द करून पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेचे १४ गट आणि पंचायत समित्यांच्या २७ जागांसाठी ५ ऑक्टोबर रोजी पोटनिवडणूक होत आहे.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसची महाविकास आघाडी असल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकादेखील महाविकास आघाडी एकत्रितपणे लढवेल, असे अनेकवेळा वरिष्ठ पातळीवरून स्पष्ट करण्यात आले. त्याअनुषंगाने जिल्ह्यातही जि. प. पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीबाबत शिवसेना, रा. काँ. व काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या झाल्या. मात्र, प्रतिष्ठेच्या काही जागांवरून यशस्वी तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे अद्याप तरी महाविकास आघाडीची घोषणा होऊ शकली नाही. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत २७ सप्टेंबर अशी आहे. बहुतांश ठिकाणी शिवसेना, रा. काँ. व काँग्रेसच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज दाखल केलेले आहेत. महाविकास आघाडीबाबत अद्याप काही निश्चित नसल्याचे जिल्हाध्यक्षांनी स्पष्ट केले. उमेदवारी मागे घेण्याबाबत हालचाली नसल्याने, तिन्ही पक्ष स्वबळावर पोटनिवडणुकीला सामोरे जाण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे. महाविकास आघाडी होणार की नाही, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.
००००००
कोणी किती गटात उमेदवार उभे केले...
शिवसेना : १२
राष्ट्रवादी काँग्रेस : १४
काँग्रेस : १२
.......
प्रत्येकाकडून स्वबळाची तयारी!
जिल्हा परिषद व पंचायत समिती पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीबाबत ठोस निर्णय न झाल्याने तिन्ही पक्षांनी उमेदवार उभे केले आहेत. शिवसेना व काँग्रेसकडून रिसोड तालुक्यातील गोभणी, वाशिम तालुक्यातील काटा गटाची जागा प्रतिष्ठेची करण्यात आल्याने येथे अद्याप तोडगा निघू शकलेला नाही. महाविकास आघाडी न झाल्यास ऐनवेळी धावपळ नको, म्हणून तिन्ही पक्षांनी प्रबळ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवून स्वबळाची तयारी चालविली आहे. विश्वसनीय सूत्रानुसार, महाविकास आघाडीची शक्यता धूसर असून, बहुतांश ठिकाणी तिन्ही पक्षांचे उमेदवार स्वबळावर निवडणुकीला सामोरे जातील.
००००००
आज होणार निवडणुकीचे चित्र स्पष्ट
जिल्हा परिषदेच्या १४ गटांसाठी १२२ व पंचायत समितीच्या २७ गणांसाठी १९४ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. २७ सप्टेंबर या अंतिम मुदतीत कोण माघार घेणार, हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतर तिरंगी की चौरंगी लढती होणार, याचे चित्र स्पष्ट होणार आहे.