देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
By संतोष वानखडे | Updated: January 15, 2024 19:07 IST2024-01-15T19:07:37+5:302024-01-15T19:07:47+5:30
वाशिमात भूमि हक्क परिषद.

देशाचे संविधान कोणीही बदलू शकत नाही - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले
वाशिम : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला संविधान दिले. देशाचे संविधान कोणिही बदलू शकत नाही. मात्र संविधान बदलत असल्याबाबत काँग्रेस व विरोधी पक्ष हे जनतेची व समाजाची दिशाभूल करीत असल्याचे टिकास्त्र केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी १५ जानेवारी रोजी वाशिम येथील भूमि हक्क परिषदेत सोडले.
स्थानिक वाटाणे लॉन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) च्यावतीने आयोजित आयोजित भूमि हक्क परिषदेचे उद्घाटक म्हणून ना. रामदास आठवले होते. या परिषदेच्या अध्यक्षस्थानी रिपाईचे (आ.) जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे होते. पुढे बोलताना ना. आठवले म्हणाले, देशाचे संविधान अबाधित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशातील सर्वधर्मीय समाजबांधवांना सोबत घेऊन चालत आहेत, सर्वांना न्याय देत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी खऱ्या अर्थाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान केला आहे. यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनीदेखील मनोगत व्यक्त केले. कडूबाई खरात यांनी भीमगितांचा बहारदार कार्यक्रम सादर केला. परिषदेला मोठ्या संख्येने रिपाईचे कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हाभरातून आलेले नागरीक उपस्थित होते.
भूमिहीनांना जमिनी देण्याची मागणी रेटणार
भूमि हक्क परिषदेच्या मध्यमातुन आपन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजीत पवार यांची भेट घेवुन कष्टकरी, भूमिहीन दलित समाजातील लोकांना जमिन देण्याची मागणी आपण रेटणार असल्याचे आश्वासन ना. आठवले यांनी दिले. प्रलंबित वाशिम-बडनेरा रेल्वे मार्गाबाबत निधिसाठी पाठपुरावा करणार असल्याचे सांगतानाच, वाशिम-जालना या लोहमार्गासाठी सुद्धा केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची शिष्टमंडळज्ञसोबत लवकरच भेट घेऊ, असेही आठवले यांनी सांगितले.