No instructions to close old Rs 5, 10 notes! | पाच, १० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याबाबत सूचना नाहीत!

पाच, १० रुपयांच्या जुन्या नोटा बंद होण्याबाबत सूचना नाहीत!


लोकमत न्यूज नेटवर्क 
वाशिम : जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चेने व्यापाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये संभ्रम निमार्ण झाला आहे. दरम्यान, या जुन्या नोटा बंद होण्याबाबत वरिष्ठांकडून कोणत्याही सूचना किंवा पत्र नसल्याचे जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांनी स्पष्ट केले. 
केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१७ मध्ये एक हजार आणि ५०० रुपयांची नोट चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आणि नोटा बदलण्यासाठी नागरिकांना बँकांसमोर रांगेत उभे राहावे लागले होते. आता जुन्या १००, १० आणि ५ रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याचे संकेत रिझर्व्ह बँकेने दिल्याचे वृत्त सोशल मीडियात झळकत आहे. मात्र, याला अधिकृत दुजोरा नाही. दुसरीकडे यामुळे नागरिकांसह व्यापाऱ्यांमध्ये थोडी संभ्रमावस्था असून, काही जण ५, १० आणि १०० रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी बँकेत धाव घेत आहेत.


बँकांना सूचना नाहीत!
जुन्या पाच, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होण्यासंदर्भात जिल्ह्यातील बँकांना अद्याप कोणत्याही सूचना नाहीत. सोशल मीडियात या नोटासंदर्भात वाचण्यात आले; परंतु अधिकृत पत्र किंवा सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे या नोटासंदर्भात तुर्तास तरी काही सांगता येणार नाही. काही नागरिक १०, १०० रुपयांच्या नोटा बँकेत जमा करीत आहेत.


व्यापाऱ्यांकडून नोटांचा स्वीकार!
जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होणार असल्याच्या चर्चेने या नोटा अधिक संख्येने बाजारपेठेत येत असल्याचे दिसून येते. काही जण या नोटा बँकेत जमा करीत आहेत तर काही जण विविध प्रकारच्या साहित्य खरेदीत या नोटा वापरत आहेत.   व्यापारी मात्र पाच, १० व १०० रुपयांच्या नोटा स्वीकारत असल्याचे वाशिम शहरासह जिल्ह्यात दिसून येते. 


जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होण्यासंदर्भात सोशल मीडियात वाचण्यात आले आहे; परंतु वरिष्ठ स्तरावरून अद्याप कोणत्याही सूचना किंवा पत्र नाही. जिल्ह्यात या नोटा स्वीकारल्या जात आहेत.
- दत्तात्रय निनावकर 
व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक 


जुन्या ५, १०, १०० रुपयांच्या नोटा बंद होण्यासंदर्भात अधिकृत काहीच नसल्याने या नोटा व्यापाऱ्यांकडून स्वीकारल्या जात आहेत. बँकांमध्येदेखील या नोटा स्वीकारण्यात येत आहेत.
-आनंद चरखा 
जिल्हाध्यक्ष, युवा व्यापारी संघटना वाशिम
 

Web Title: No instructions to close old Rs 5, 10 notes!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.