मेडशी येथील युवकांनी तयार केली निर्मलग्रामची चित्रफीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 01:16 IST2017-09-05T01:15:31+5:302017-09-05T01:16:15+5:30
उघड्यावरील हगणदरीने गावाची प्रतिमा मलिन होण्यासोबतच विविध स्वरूपातील आजारांना आयतेच निमंत्रण मिळते. त्यामुळे हा प्रकार पूर्णत: बंद होऊन शौचालयांचा वापर वाढावा, यासाठी शासनस्तरावरून महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले जात आहेत. त्यास हातभार लागावा, या उद्देशाने तालुक्यातील मेडशी या गावातील हौशी युवकांनी वेशभूषा परिधान करून चित्रफीत तयार केली. त्यात निर्मलग्राम, स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार-प्रसार करण्यात आला असून, ही चित्रफीत सध्या व्हॉट्स अँप, फेसबुकवर चांगलीच गाजत असल्याचे दिसून येत आहे.

मेडशी येथील युवकांनी तयार केली निर्मलग्रामची चित्रफीत!
अरविंद गाभणे।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव: उघड्यावरील हगणदरीने गावाची प्रतिमा मलिन होण्यासोबतच विविध स्वरूपातील आजारांना आयतेच निमंत्रण मिळते. त्यामुळे हा प्रकार पूर्णत: बंद होऊन शौचालयांचा वापर वाढावा, यासाठी शासनस्तरावरून महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविले जात आहेत. त्यास हातभार लागावा, या उद्देशाने तालुक्यातील मेडशी या गावातील हौशी युवकांनी वेशभूषा परिधान करून चित्रफीत तयार केली. त्यात निर्मलग्राम, स्वच्छ भारत अभियानाचा प्रचार-प्रसार करण्यात आला असून, ही चित्रफीत सध्या व्हॉट्स अँप, फेसबुकवर चांगलीच गाजत असल्याचे दिसून येत आहे.
जावेद भवानीवाले या युवकाच्या शेतातील पडीक जमिनीवर झोपडी आहे. त्या ठिकाणी आपल्या मित्रांना सोबत घेऊन त्याने निर्मलग्राम योजनेच्या प्रचार-प्रसाराच्या अनुषंगाने चित्रफीत तयार करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने ज्याला शोभेल तशी सरपंच, गुडमॉर्निंग पथक, गावकरी, आजारी व्यक्तींची भूमिका देण्यात आली. याद्वारे संबंधित युवकांनी शौचालयांचा वापर करण्याचा आणि गावकुसात कायम स्वच्छता राखण्याचा मोलाचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. याकामी जावेदअली भवानी याच्यासह मोसिन धन्नू भवानीवाले, सुमित गुडदे, आकाश खिल्लारे, मोहन सावळे, रहीम बागवान या युवकांनी पुढाकार घेतला. ही चित्रफीत सध्या सोशल मीडियावर चांगलीच धूम करीत आहे.
जावेदने रचले संतांचे अभंग!
मेडशी येथील रहिवासी जावेदअली भवानीवाले या युवकाने संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम महाराज, संत गाडगेबाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जीवनचरित्र्यावर आधारित ‘संतांनो आम्हा अभिमान आहे’ हा अभंग रचला असून, त्यास या साहित्याप्रती अकोट येथे आयोजित राज्यस्तरीय अभंग स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले होते. चालू वर्षी जानेवारी महिन्यात ही स्पर्धा झाली होती.
-