‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेत ‘नेट कनेक्टिव्हिटी’चा अडथळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 17:10 IST2018-04-25T17:10:49+5:302018-04-25T17:10:49+5:30
ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्रांमध्ये दिवसभरातून अनेकवेळा ‘नेट कनेक्टिव्हिटी’त तांत्रिक अडथळा उद्भवत असून अर्ज दाखल करून घेणे अशक्य ठरत असल्याने निराधार लाभार्थी अक्षरश: हैराण झाले आहेत.

‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रियेत ‘नेट कनेक्टिव्हिटी’चा अडथळा!
वाशिम : जिल्ह्यातील सर्वच ठिकाणच्या तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थींची प्रकरणे मंजूर करण्यासाठी ‘आॅनलाईन’ अर्ज प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार, १५ एप्रिलपासून ५ मे पर्यंत संबंधित लाभार्थ्यांना अर्ज करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात मात्र ग्रामीण भागातील आपले सरकार सेवा केंद्र, महा-ई-सेवा केंद्रांमध्ये दिवसभरातून अनेकवेळा ‘नेट कनेक्टिव्हिटी’त तांत्रिक अडथळा उद्भवत असून अर्ज दाखल करून घेणे अशक्य ठरत असल्याने निराधार लाभार्थी अक्षरश: हैराण झाले आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशिम तहसील कार्यालयांतर्गत संजय गांधी निराधार योजना समितीची महत्वपूर्ण सभा १५ मे रोजी सकाळी ११ वाजता घेण्यात येणार आहे. फेब्रुवारी २०१८ या महिन्यात त्रुटीमध्ये अडकलेल्या प्रकरणांवर चर्चा होवून या बैठकीत त्यास मंजुरात दिली जाणार आहे. त्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी आपली परिपूर्ण प्रकरणे १५ एप्रिल ते ५ मे या कालावधीत महा-ई सेवा-केंद्रांमार्फत ‘आॅनलाईन’ सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त २१ हजार रुपये वार्षिक उत्पन्न आणि वयाची ६५ वर्षे पुर्ण झालेली असावीत, असा नियम असून यासंदर्भातील इत्यंभूत माहिती ‘आॅनलाईन’ पद्धतीने सादर करणे क्रमप्राप्त आहे. मात्र, ग्रामीण भागात विनाखंडित ‘नेट कनेक्टिव्हिटी’ मिळत नसल्याने या प्रक्रियेत मोठा अडथळा निर्माण होत असून त्याचा फटका निराधार लाभार्थ्यांना बसण्याची शक्यता उद्भवली आहे.