जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर ‘पाणी बचत’ गरजेची
By Admin | Updated: August 3, 2015 00:56 IST2015-08-03T00:56:49+5:302015-08-03T00:56:49+5:30
पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबवणे गरजेचे; जलपुनर्भरण मोहिम साहाय्यभूत.

जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर ‘पाणी बचत’ गरजेची
वाशिम : गत पाच-सात वर्षांंपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे जलपातळी घटत चालली आहे. परिणामी उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच जलसंकट निर्माण होते. संभाव्य जलसंकट आटोक्यात आणण्यासाठी सुरूवातीपासूनच 'पाणी बचत' करणे गरजेचे बनत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले. 'लोकमत'तर्फे २ ऑगस्ट रोजी ठराविक प्रश्नांवर सर्वेक्षण केले असता, पाणी बचत करणे काळाची गरज असल्यावर नागरिकांनी शिक्कामोर्तब केले आहे. बेसुमार वृक्षतोड व अन्य कारणांमुळे दरवर्षीच पावसाळ्यात उन्हाळा आणि हिवाळ्यात पावसाळा किंवा उन्हाळ्यात पावसाळा असे चित्र असते. पावसात सातत्य नसल्याने आणि पावसाच्या पाण्याचा योग्य वापर केला जात नसल्याने पाणीटंचाई दिवसेंदिवस गंभीर विषय बनत चालला आहे. या पृष्ठभूमीवर 'लोकमत'तर्फे काही प्रश्नांवर सर्वेक्षण केले असता, जलपुनर्भरण, रेन वॉटर हॉर्वेस्टिंग, पाणी बचत आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी नोंदविले. 'रेन वॉटर हॉर्वेस्टिंग' या पाणी बचतीच्या व्यवस्थेची माहिती आपणाला आहे काय? या प्रश्नावर ७८ टक्के नागरिकांनी होय असे उत्तर दिले तर २२ टक्के नागरिक यापासून अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. 'रेन वॉटर हार्वेस्टिंग'बाबत प्रशासनाने आणखी जनजागृती करावी, असे ६७ टक्के नागरिकांना वाटते. भूगर्भातील पाण्याचा अतिरिक्त उपसा थांबविणे आवश्यक ठरत असल्याचे मत ८२ टक्के नागरिकांनी व्यक्त केले. संभाव्य जलसंकटाच्या पृष्ठभूमीवर 'पाणी बचत' करणे गरजेचे आहे, असे १00 टक्के नागरिकांचे मत आहे. जलपातळी वाढविण्याकामी जलपुनर्भरण मोहिम साहाय्यभूत ठरणारी आहे, असे ९४ टक्के नागरिकांना वाटते. निसर्ग चक्र अनियमिततेला बेसुमार वृक्षतोड कारणीभूत आहे, असे मत ७४ टक्के नागरिकांनी नोंदविले आहे.