जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ कारंजात मुकमोर्चा
By संतोष वानखडे | Updated: September 4, 2023 16:43 IST2023-09-04T16:41:29+5:302023-09-04T16:43:41+5:30
या घटनेच्या निषेधार्थ कारंजा तालुक्यातील सकल मराठा समाजबांधव एकवटून सोमवार, ४ सप्टेंबर रोजी मुकमोर्चा काढण्यात आला.

जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ कारंजात मुकमोर्चा
संतोष वानखडे, वाशिम : जालना जिल्ह्यातील अंतरावली सराटी (ता. अंबड) येथे मराठा आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवार, १ सप्टेंबर रोजी हिंसक वळण लागले. या घटनेच्या निषेधार्थ कारंजा तालुक्यातील सकल मराठा समाजबांधव एकवटून सोमवार, ४ सप्टेंबर रोजी मुकमोर्चा काढण्यात आला.
कारंजा शहरातील छत्रपती शिवाजी नगर येथून मुकमोर्चाला प्रारंभ झाला. जाणता राजा चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, भगतसिंग चौक, जयस्तंभ चौक मार्गे मोर्चा हा तहसील कार्यालयावर धडकला. विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदारांमार्फत राज्य शासनाला दिले. तहसिल कार्यालय परिसरात या मोर्चाचा समारोप झाला. या दरम्यान, कारंजा शहरात बंदही पाळण्यात आला. मुकमोर्चात सकल मराठा समाजबांधव बहुसंख्येने उपस्थित होते.
उद्या वाशिम, मंगरूळपीर बंद
अंतरावली सराटी (ता. अंबड) येथील घटनेच्या निषेधार्थ ५ सप्टेंबर रोजी सकल मराठा क्रांती मोर्चा व सर्वधर्मीय समाजबांधवांच्यावतीने वाशिम व मंगरूळपीर शहर बंदची हाक देण्यात आली.