खासदार भावना गवळींनी केली रेल्वे स्टेशन पार्किंग ठेकेदाराची कानउघाडणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 14:20 IST2019-11-04T14:20:14+5:302019-11-04T14:20:46+5:30
ठेकेदाराची कानऊघाडणी करून तासभर कुठलेही वाहन पार्कींगमध्ये असल्यास शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले.

खासदार भावना गवळींनी केली रेल्वे स्टेशन पार्किंग ठेकेदाराची कानउघाडणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : येथील रेल्वे स्टेशनच्या बाहेर वाहन पार्कींगचा कंत्राट सांभाळणाऱ्या ठेकेदाराने चक्क खासदार भावना गवळी यांच्याशीच उद्धटपणा केला. यामुळे शिवसैनिक चांगलेच संतापले. दरम्यान, खासदार गवळी यांनी यावेळी संबंधित ठेकेदाराची कानऊघाडणी करून तासभर कुठलेही वाहन पार्कींगमध्ये असल्यास शुल्क न आकारण्याचे निर्देश दिले. त्याचे पालन न केल्यास याद राखा, असा दमही त्यांनी यावेळी भरला.
वाशिम रेल्वेस्टेशन परिसरात वाहन पार्कींगचा कंत्राट असलेल्या ठेकेदाराकडून प्रवासी व आॅटोचालकांना उद्धटपणाची वागणूक मिळते, नियमबाह्य पद्धतीने वाहन पार्कींगचे पैसे आकारले जातात, त्याचची पावती कोºया कागदावर दिली जाते. वाहनधारकांना दमदाटी करणे, वाहनांमधील हवा सोडून देणे असे प्रकारही होत असल्याची तक्रार काही नागरिकांनी खासदार भावना गवळी यांच्याकडे केली होती. दरम्यान, रविवारी गवळी यांनी रेल्वे स्टेशन गाठून याबाबतची खातरजमा केली असता, नागरिकांच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. त्यानंतर संबंधित ठेकेदारास बोलावून नियमबाह्य प्रकार बंद करण्याबाबत सांगत असताना ठेकेदाराने खासदार गवळी यांच्याशी देखील उद्धटपणा केला. त्यामुळे त्याठिकाणी उपस्थित काही शिवसैनिक ठेकेदाराच्या अंगावर धावून गेले; मात्र सामंजस्याने तोडगा निघाल्याने प्रकरण निवळले. यापुढे एक तास कुठलेही वाहन पार्कींगमध्ये असल्यास त्याचे शुल्क आकारू नये, असे निर्देश खासदार गवळी यांनी संबंधित ठेकेदारास दिले. यावेळी गवळी यांनी रेल्वे स्टेशनच्या संबंधित अधिकाऱ्यांनाही धारेवर धरले.