आईसह चिमुकली विहिरीत पडली; आई बचावली, चिमुकलीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2019 13:57 IST2019-11-10T13:57:38+5:302019-11-10T13:57:48+5:30
माता वैशाली सुखरूप तर चिमुकली अनुष्काचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची ह्रदयद्रावक घटना १० नोव्हेबर रोजी सकाळी सहा वाजतादरम्यान मारसुळ येथे उघडकीस आली.

आईसह चिमुकली विहिरीत पडली; आई बचावली, चिमुकलीचा मृत्यू
लोकमत न्यूज नेटवर्क
राजुरा (वाशिम) : मालेगाव तालुक्यातील मौजे मारसुळ येथील वैशाली निखिल घुगे वय (२५) हि महिला आपल्या चार महिन्यांच्या चिमुकलीसह गावानजीकच्या विहिरीत पडली. यामध्ये माता वैशाली सुखरूप तर चिमुकली अनुष्काचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची ह्रदयद्रावक घटना १० नोव्हेबर रोजी सकाळी सहा वाजतादरम्यान मारसुळ येथे उघडकीस आली.
पोलीस सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार वैशाली हि सकाळी झोपेतून उठल्यानंतर मुलगी अणुष्का (वय ४ महिने) हिला सोबत घेऊन पाणी आणण्यासाठी विहिरीवर गेली होती पाण्याचे भांडे विहिरीचे काठावर ठेवून अण्षुकाला बाजुला ठेवत असताना वैशालीचा तोल जाऊन ति मुलीसह विहिरीत पडली. पडताक्षणीच मुलगी हातातुन सुटल्याने ति पाण्याच्या तळाशी गेली, परंतु वैशालीला ब-यापैकी पोहणे येत असल्याने तिने पोहुन काठावरील कंगणी पकडून तिचा आधार घेतला, तर मुलगी अणुष्का हि तिच्या डोळ्यादेखत मृत्यूच्या दाढेत खेचल्या गेली. सकाळी गावातील काही महिला पाणी भरण्यासाठी विहिरीवर गेल्या असता त्यांना वैशाली विहिरीत आढळून आली. यावेळी ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन वैशालीला सुखरूपपणे विहिरीतून बाहेर काढले. घटनेची माहिती मालेगाव पोलीसांना मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन चिमुकली अनुष्काचा मृतदेह ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी मालेगाव येथे पाठविण्यात आला. वैशाली हिला दुसरी एक पाच वर्षांची मुलगी असल्याचे समजते. चिमुकली अनुष्काच्या दुर्दैवी मृत्यूबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. सदर घटनेबाबत ग्रामस्थामध्ये अनेक शंका कुशंका चर्चील्या जात असुन या प्रकरणाचा अधिक तपास मालेगावचे पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार उत्तम राठोड शिपाई अमोल पाटील हे करीत आहेत.