मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून बचत गटांची सामुहिक विकासाकडे वाटचाल !
By Admin | Updated: April 30, 2017 14:16 IST2017-04-30T14:16:12+5:302017-04-30T14:16:12+5:30
जिल्ह्यातील ४० बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा करण्यात आला आहे.

मिनी ट्रॅक्टरच्या माध्यमातून बचत गटांची सामुहिक विकासाकडे वाटचाल !
वाशिम - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना ९० टक्के अनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने (कल्टीवेटर किंवा रोटावेटर व ट्रेलर) यांचा पुरवठा करण्यात येतो. जिल्ह्यातील ४० बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा पुरवठा करण्यात आला आहे. या माध्यमातून बचत गटांची सामुहिक विकासाकडे वाटचाल सुरू असल्याचे दिसून येते.
वैयक्तिक लाभाच्या योजनांपेक्षा सामुहिक लाभाच्या योजनांना प्राधान्य दिले जात आहे. या अनुषंगाने सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना ९० टक्के अनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने दिली जातात. मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांच्या खरेदीची कमाल मर्यादा ३ लाख ५० हजार रुपये आहे. स्वयंसहाय्यता बचत गटांनी या मर्यादेच्या १० टक्के स्वहिस्सा भरल्यानंतर ९० टक्के शासकीय अनुदान दिले जाते. जवळपास ३ लाख १५ हजार रुपये अनुदानाची रक्कम आहे. जिल्ह्यात जवळपास ४० बचत गटांना मिनी ट्रॅक्टरचा लाभ देण्यात आला आहे, अशी माहिती सहायक आयुक्त माया केदार यांनी दिली.
... तर फौजदारी गुन्हे दाखल होणार !
बचतगटांना दिल्या जाणारे मिनी ट्रॅक्टर विकल्यास अथवा गहाण ठेवल्यास तो व्यवहार बेकायदेशीर ठरवून संबंधित स्वयंसहाय्यता बचतगटांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल. सोबतच सबंधित बचतगटांना शासनाच्या इतर योजनांचा लाभ घेण्यास किमान ५ वर्षे अपात्र ठरविले जाईल. तशा आशयाचे हमीपत्र स्वयंसहाय्यता बचतगटांकडून भरून घेतले आहे.