मानोरामध्ये 9 घरांना भीषण आग, लाखोंचे नुकसान!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2019 03:11 PM2019-04-26T15:11:04+5:302019-04-26T15:24:39+5:30
मानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील धुरे पेटवून देण्यात आले. त्याचा भडका उडून तब्बल नऊ घरांनाही भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.
मानोरा (वाशिम) - मानोरा शहरातील सुभद्राबाई महाविद्यालयाला लागून असलेल्या भायजीनगराशेजारच्या शेतांमधील धुरे पेटवून देण्यात आले. त्याचा भडका उडून तब्बल नऊ घरांनाही भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत लाखो रुपयांचे नुकसान झाले. मात्र, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमठाणा ग्रामपंचायतीच्या हद्दीत येत असलेल्या भायजी नगर येथे आगामी खरीप हंगामापूर्वी शेत मशागतीची कामे करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी शेतातील धुरे पेटवून दिले. त्याचा मोठा भडका होऊन परिसरात एकमेकांना लागून असलेली घरे आगीच्या कवेत सापडली. त्यात घरांमधील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. स्थानिक नागरिकांनी ही आग विझविण्याचा आटोकात प्रयत्न केला. यादरम्यान दिग्रस, मंगरूळपीर, कारंजा येथून अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले. मात्र, तोपर्यंत बरेच नुकसान झाले होते. नुकसानग्रस्तांमध्ये देवानंद शामराव वाघमारे, गजानन चंपत सोनोने, अरूण सुखदेव पखमोडे, अरूण विश्वनाथ कांबळे, गुलाब मोरकर, सुरेखा गजानन सोनोने, महादेव बापुराव कुडबे, शामराव बिरम, मिसनकर, अशोक उत्तम कोल्हे आदिंच्या घरांचा समावेश आहे.
घटनेची माहिती मिळताच मानोराचे तहसीलदार डॉ. सुनील चव्हाण यांनी घटनास्थळास भेट देत पाहणी केली. महसूल प्रशासनाच्या वतीने मंडळ अधिकारी एस.बी. जाधव, तलाठी एम.के. खंडारे, के.व्ही. फटकवढाकरे, पी.बी. आचार, एस.डी. शेजोड, एम.एम. रणखांब यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
रिसोड तालुक्यातील रिठद येथे याआधी 7 एप्रिलच्या रात्री सहा घरांना आग लागल्याने 15 लाख रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाले होते. रिठद येथील माधव आरु यांच्या घराला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने रुद्ररूप धारण केले होते. या आगीत शेजारील चार ते पाच घरे जळाली. घराला आग लागल्याचे निदर्शनात येताच, घरातील सर्व मंडळी घराबाहेर पडली. त्यामुळे या आगीत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. माधव आरू यांच्या घरातील सोयाबीन, हरबऱ्यासह 55 हजारांची रक्कम जळून खाक झाली होती. माधव आरू यांच्या शेजारी असलेले तुकाराम आरू, विश्वनाथ आरू, कुंडलिक आरू यांच्यासह अन्य एक ते दोन जणांच्या घराला आग लागली. या आगीत जवळपास 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली होती.