वाशिम जिल्ह्यातील मनभा प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 13:21 IST2018-08-08T13:20:35+5:302018-08-08T13:21:25+5:30
मनभा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकही अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे.

वाशिम जिल्ह्यातील मनभा प्राथमिक आरोग्य केंद्र वाऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
मनभा : ग्रामीण भागातील रुग्णांना वेळेवर उपचार मिळावा यासाठी शासनाच्यावतिने गावोगावी प्राथमिक आरोग्यकेंद्राची स्थापना केली. परंतु मनभा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एकही अधिकारी मुख्यालयी राहत नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांअभावी रुग्णालय वाºयावर सोडून दिल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.
मनभा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्थायी आरोग्य अधिकारी नसल्याने आरोग्य केंद्राची दुरावस्था झाली आहे. रुग्णालयात असलेल्या साहित्याची, दरवाजे, खिडक्या व इतर वस्तुंची तुटफूट झाली. सद्या पावसाळयाचे दिवस असल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ आहे, परंतु येथे कर्मचारी काही वेळेवर तर काही आपल्या सोयीनुसार येवून रुग्णांवर उपचार करतात. एखादयावेळी गंभीर रुग्ण आल्यास कर्मचारी हजर नसल्यास त्याला दुसरीकडे उपचारास जावे लागत आहे. याचा आर्थीक फटका गोरगरिब रुग्णांना बसत आहे. या केंद्रात वैद्यकीय अधिकारी, परिचारिका , औषधी वितरक कोणीही मुख्यालयी राहत नसल्याने या आरोग्य केंद्राकडे त्यांचे दुर्लक्ष दिसून येत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्षदेणे गरजेचे असतांना सुध्दा त्यांचे याकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.
आरोग्य केंद्रातील शौचालयामध्ये खड्डे,तर टाके उघडे पडले आहे. दवाखान्याची साफसफाई नियमित करण्यात येत नसून आरोग्य केंद्राभोवती सर्वत्र गाजर गवत निर्माण झाले आहे. रुग्णांवर उपचार केल्यास आरोग्य केंद्रामध्ये औषधीचा तुटवडा हे नेहमीचेच झाले आहे. तसेच येथे येणारे आरोग्य अधिकारी सुध्दा नियमित बदल होतांना दिसून येत असल्याने नेमके येथे कोण कर्तव्यावर आहे हे ही कळेनासे झाले आहे.
तरी वरिष्ठ अधिकाºयांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देवून येथील आरोग्य केंद्राचा कारभार सुरळीत करण्याची मागणी ग्रामस्थांमधून केल्या जात आहे.