मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 18:24 IST2018-08-10T18:23:40+5:302018-08-10T18:24:52+5:30
मालेगाव - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक लक्षात घेता मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, एका राजकीय पक्षाचा मोठा गट दुसºया राजकीय पक्षाच्या संपर्कात असल्याने मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव - आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुक लक्षात घेता मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, एका राजकीय पक्षाचा मोठा गट दुसºया राजकीय पक्षाच्या संपर्कात असल्याने मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या आठवड्यात झालेल्या मालेगाव नगर पंचायतच्या निवडणुकीमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. नगर पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीने सर्व राजकीय समिकरणे बदलून टाकली आहेत. सर्व राजकीय पक्षाचे नेते एका व्यासपीठावर आले असताना, त्यांच्याकडून शहरवासियांना शहराच्या विकासाच्या अपेक्षा उंचाविल्या आहेत.
गत निवडणुकीत मालेगाव नगर पंचायतवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती. मागील निवडणुकीची समीकरणे बदलत यावेळी काँग्रेस पक्षाला बाजूला सरून राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना,, शिवसंग्राम आणि भारतीय जनता पार्टी हे सर्व सदस्य त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या सूचनेवरून एकत्र आल्याचे बोलले जात आहे.
आता आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टिने मालेगाव तालुक्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारतीय रिपब्लिकन पक्ष यांच्या संपर्कात असून लवकरच तो मोठा गट पक्ष प्र्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.
मालेगाव तालुक्यात राजकारणाच्या बाबतीत वेगळीच परिस्थिती प्रत्येक वेळेस असते. याठिकाणी काँग्रेस पक्षाचे आमदार असतात तर खासदार भाजप असतात. तालुक्यात अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेवर राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. तालुक्यातील अर्ध्याअधिक ग्रामपंचायती सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मालेगाव नगरपंचायत अध्यक्षसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. तालुक्यातील अनेक सेवा सहकारी सोसायट्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात आहेत. मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे वर्चस्व आहे. अकोला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालकसुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस मालेगाव तालुक्यात आपले राजकीय वजन ठेवून असताना, नेमके आता राष्ट्रवादी कॉग्रेसचा एक मोठा गटच अन्य पक्षांच्या संपर्कात असल्याने विविध चर्चेला ऊत आला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असण्याबरोबरच, शिवसेनेचे वरिष्ठ नेते तसेच भारिप-बमसंच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचालींना वेग आला असून तालुक्यात मोठी राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.