मालेगाव बाजार समिती सभापतींविरुध्द अविश्वास पारित
By Admin | Updated: September 19, 2014 23:49 IST2014-09-19T23:32:38+5:302014-09-19T23:49:55+5:30
सभापती विरोधात १३ संचालकांनी दाखल केला अविश्वास ठरावाचा प्रस्ताव.

मालेगाव बाजार समिती सभापतींविरुध्द अविश्वास पारित
मालेगाव : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश शिंदे विरोधात सत्ताधारी गटाच्या ८ व विरोधी गटाच्या ५ अशा एकूण १३ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव आज १९ सप्टेंबर रोजी झालेल्या सभेत पारित झाला आहे.
मालेगाव बाजार समितीमध्ये मार्केट बचाव पॅनलचे वर्चस्व आहे. ८ महिन्यापूर्वी मालेगाव बाजार समितीच्या सभापती पदी सुरेश शिंदे यांची निवड करण्यात आली होती. त्यानंतर काही महिन्यातच सभापती शिंदे हे संचालकांना विश्वासात घेवून चालत नाहीत, त्यांचा प्रशासनावर वचक नाही आदी विषयाचा ठपका ठेवण्याचे काम सत्ताधारी व विरोधी गटाच्या संचालकांमधून केले जाउ लागले.
९ सप्टेंबर रोजी १३ सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. दाखल प्रस्तावावर १९ सप्टेंबर रोजी प्रशासनाच्यावतीने सभा घेण्याचे ठरविण्यात आले. त्यानुसार १९ सप्टेंबर रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात अविश्वास प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी सभा घेण्यात आली. या सभेला विद्यमान सभापती शिंदेंसह पाच संचालक गैरहजर राहिले. तर प्रत्यक्ष सभेला १३ संचालक हजर होते. उपस्थित संचालकांनी हात उंचावून अविश्वास प्रस्तावाचे सर्मथन केल्याने सभाधिकार्यांनी सभापती शिंदेंविरुध्दचा अविश्वास प्रस्ताव १३ विरुध्द 0 मतांनी पारित झाल्याचे जाहीर केले. सभेच्या एकूणच कामकाजासाठी सहाय्यक निबंधक एस. पवार तर त्यांना सहाय्यक म्हणून भोयर, बाजार समिती सचिव प्रकाशराव कढणे यांनी यांनी सहकार्य केले.