हिवताप जनजागृती मोहीम
By Admin | Updated: July 10, 2014 22:43 IST2014-07-10T22:43:43+5:302014-07-10T22:43:43+5:30
जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने व्यापक जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.

हिवताप जनजागृती मोहीम
वाशिम : पावसामुळे सर्वत्र चिखल होतो. डांसांची संख्या वाढते. त्यामुळे रोगांचे प्रमाण वाढते. या पावसाळी वातावरणात वाढणार्या रोगराईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा हिवताप कार्यालयाच्या वतीने व्यापक जनजागरण मोहीम हाती घेण्यात आली आहे.
पावसाळा सुरू झाल्यावर ठिकठिकाणी डबके साचतात. त्यामध्ये डासांची भरपूर उत्पत्ती होते. हिवताप, हत्तीरोग, डेंग्यू, जे.ई. आदी कीटकजन्य रोगांमध्ये वाढ होते. त्यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे बाबतची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवणे हा जनजागरणाचा उद्देश आहे. या मोहिमेंतर्गत गावोगावी हँडबिल वाटप करणे, नागरिकांना हिवतापाची लक्षणे, उपचार व प्रतिबंधात्मक उपाययोजनांची माहिती देणे, बॅनर्स, पोस्टर लावणे, जास्तीत-जास्त तापाच्या रुग्णांचे रक्त नमुने घेऊन त्यांना उपचार करणे, प्रत्येक गावात हिवताप विषयक म्हणी लिहिणे, इत्यादी उपक्रम राबविण्यात येतात. कोणताही ताप हिवताप असू शकतो म्हणून ताप आल्यावर त्वरित आरोग्य कर्मचारी किंवा आरोग्य केंद्रात जाऊन रक्त तपासून घ्यावे, क्लोरोक्विन गोळ्या घ्याव्यात, रक्त नमुना तपासणी नंतर हिवतापास आढळल्यास ज्यांच्या रक्तात हिवतापाचे जंतू ज्या प्रमाणात असतील त्याप्रमाणे वयोमानानुसार क्लोरोक्वीन प्रायमॉक्विन या गोळ्याची मात्रा देण्यात येते.
हा उपचार न कंटाळता सलग घ्यावा, आपल्या विभागात कीटकनाशक फवारणी पथक आल्यास आपली संपूर्ण घरे फवारून घ्यावीत, फवारणी झालेली घरे तीन महिन्यांपर्यंत सारवू व रंग देऊ नयेत, एवढी काळजी घ्या असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. पावसाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेण्याचाही सल्ला आरोग्य विभागाने दिला आहे.