एकाही ग्रामपंचायतीमध्ये ‘महानेट’ प्रकल्प कार्यान्वित नाही!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2020 14:52 IST2020-01-07T14:51:51+5:302020-01-07T14:52:00+5:30
वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतीत महानेट प्रकल्प कार्यान्वित होऊ शकली नाही.

एकाही ग्रामपंचायतीमध्ये ‘महानेट’ प्रकल्प कार्यान्वित नाही!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुका वगळता अन्य पाच ठिकाणच्या तहसील कार्यालयांसह ३३६ ग्रामपंचायतींमध्ये उच्च क्षमतेची इंटरनेट जोडणी उपलब्ध करून देण्यासाठी महा नेट प्रकल्प उभारण्यात येणार आहे. प्रत्यक्षात मात्र तांत्रीक स्वरूपातीली कामे सुरू होऊन वर्षभरापेक्षा अधिक कालावधी उलटून देखील अद्यापपर्यंत एकाही ग्रामपंचायतीत महानेट प्रकल्प कार्यान्वित होऊ शकली नाही.
राज्यशासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने फेब्रुवारी २०१८ मध्ये घेतलेल्या निर्णयानुसार, ग्रामीण भागात कार्यान्वित ‘आपले सरकार सेवा केंद्र’, डिजिटल शाळा आदिंना सदोदित तथा गती असलेल्या इंटरनेटची सुविधा पुरविण्यासाठी ठराविक तहसील कार्यालये आणि ग्रामपंचायतींमध्ये माहिती तंत्रज्ञान महामंडळामार्फत महा नेट प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. त्यात वाशिम जिल्ह्यातील वाशिम, मंगरूळपीर, मानोरा, मालेगाव, कारंजा आणि रिसोड ही सहाही तहसील कार्यालये आणि त्यातील ४९१ ग्रामपंचायतींचा समावेश होता. दरम्यान, प्रकल्प कार्यान्वित करण्याच्या पहिल्या टप्प्यात मंगरूळपीर तालुक्यातील कामे पूर्ण झाली असून मानोरा तालुक्यातील पाच ग्रामपंचायतींसह अन्य चार तालुक्यांमधील तहसील कार्यालये आणि ३३६ ग्रामपंचायतींमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.
याअंतर्गत ‘पॉर्इंट आॅफ प्रेझेन्स’ (पीओपी) स्थापित करण्यासाठी ‘नेटवर्क टर्मिनेशन डिव्हाईसेस’ आणि इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे स्थापित केली जाणार असून त्यासाठी लागणारी पर्याप्त जागा, विद्यूतची पुरेशी सुविधा, इलेक्ट्रीक खांबांवरून टाकले जाणारे केबल्स आदी कामे केली जात आहेत; मात्र त्याची गती अगदीच संथ असून वर्षभरानंतर देखील एकाही ग्रामपंचायतीत हा प्रकल्प कार्यान्वित होऊ शकला नाही.
सामान्य प्रशासन विभागाने फेब्रुवारी २०१८ मध्ये एका अध्यादेशानुसार वाशिम जिल्ह्यातील तहसील कार्यालये आणि ग्रामपंचायत परिसरात महा नेट प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, ठराविक पाच तहसील कार्यालये आणि जवळपास ३३६ ग्रामपंचायतींमध्ये आवश्यक ठरू पाहणाऱ्या सुविधांबाबतचे जाळे उभारण्यात येत आहे. ही कामे सद्या गतीने केली जात असून लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे.
- शेख जुनेद
प्रकल्प व्यवस्थापक, महा नेट प्रकल्प, वाशिम