आठवी ते बारावीच्या शाळेच्या घंटेची प्रतीक्षा लांबली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 12:02 PM2021-07-07T12:02:49+5:302021-07-07T12:02:56+5:30

Washim News : जिल्ह्यातील ९० हजारांवर विद्यार्थ्यांना शाळेच्या घंटेची प्रतीक्षा लागली आहे.

Long wait for school hours from 8th to 12th? | आठवी ते बारावीच्या शाळेच्या घंटेची प्रतीक्षा लांबली?

आठवी ते बारावीच्या शाळेच्या घंटेची प्रतीक्षा लांबली?

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: राज्यातील कोरोनामुक्त भागात शाळा सुरू होणार आहे. या भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग उघडण्याचा शासनाचा विचार असून, कोरोनामुक्त भागांतील  शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि हा निर्णय मागे घेण्यात आल्याची माहिती आहे.  असे असले  तरी वाशिम जिल्ह्यात कोरोनामुक्त ग्रामपंचायतींची माहिती संकलित करून शाळा सुरू करण्याबाबत जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाने हालचाली सुरू केल्या  असून, जिल्ह्यातील ९० हजारांवर विद्यार्थ्यांना शाळेच्या घंटेची प्रतीक्षा लागली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णवाढीला ब्रेक लागला आहे. कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर आता राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे.  त्यामुळे   कोरोनाकाळात बंद असलेले शाळेचे दरवाजे राज्यातील विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा उघडण्याची शक्यता निर्माण झाली होती.  राज्यातील कोरोनामुक्त भागातील आठवी ते बारावीपर्यंतचे वर्ग उघडण्याचा निर्णय घेण्यातही आला होता. त्यात  शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्याबाबतचे सर्वाधिकार हे ग्रामपंचायतींना देण्याचे नमूद केले होते. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्ह्यातील ९० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शाळा उघडण्याची  शक्यता निर्माण झाली होती. तथापि शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने पाच जुलै रोजी या संदर्भात घेतलेल्या निर्णयाबाबत अधिकृत अशी सुचना जि. प. शिक्षण विभागाला मिळाली नाही. तरीही शिक्षण विभाग कोरोनामुक्त ग्रामपंचायतीच्या माहितीचे संकलन करीत असून, पुढील निर्णयाची प्रतिक्षा सर्वांना लागली आहे. 
तर एका बाकावर बसणार एकच विद्यार्थी 
शासन निर्णय अंतिम झाल्यास व   कोरोनामुक्त ग्रामपंचायतींनी ठराव घेतल्यानंतर ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू केल्यास या शाळांमध्ये कडक नियमांचे पालन करावे लागणार आहे. शाळांमध्ये एका बाकावर केवळ एका विद्यार्थ्याला बसण्याची परवानगी असेल. तसेच दोन बाकांमध्ये सहा फुटांचे अंतर ठेवले जाईल. तसेच विद्यार्थ्यांना कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे लागणार आहे. 


आसन क्षमतेमुळे     वर्गाचे विभाजन 
कोरोनामुक्त गावांत ८ वी ते १२ वीच्या शाळा सुरू झाल्यास वर्गातील आसन क्षमता कमी करून फिजिकल डिस्टंन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे एका वर्गात विद्यार्थ्यांची संख्या ५० टक्क्यांहूनही कमी राहण्याची शक्यता असल्याने वर्गाचे विभाजन करावे लागणार असून शिक्षकांना एकाच वर्गासाठी एकाच विषयाच्या दोन किंवा त्यापेक्षा अधिक तासिका दरदिवशी घ्याव्या लागणार आहेत. 


कोरोनामुक्त भागांतील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्याबाबतचा शासन निर्णय मागे घेतल्याची  माहिती आहे.  परंतु संभाव्य स्थितीचा विचार करुन जिल्ह्यातील कोरोनामुक्त ग्रामपंचायतींची माहिती संकलित करण्याचे काम आमच्या स्तरावर सुरू करण्यात आले असून, वरिष्ठस्तरावरुन सुचनेची प्रतिक्षा आहे
-रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जि.प. वाशिम

Web Title: Long wait for school hours from 8th to 12th?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.