प्रकाश तायडे की संतोष दिवटे?
By Admin | Updated: May 13, 2014 19:20 IST2014-05-13T18:13:11+5:302014-05-13T19:20:34+5:30
शिक्षक मतदार संघ निवडणूक: काँग्रेसच्या उमेदवार निवडीचा मुहूर्त लोकसभेच्या निकालानंतर

प्रकाश तायडे की संतोष दिवटे?
अकोला: विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि शिक्षक मतदार संघात कोणतीही संघटना किंवा उमेदवाराला पाठिंबा न देता, पक्षाचा उमेदवार उतरविण्याचा निर्णय कॉंग्रेसने घेतल्यानंतर, अमरावती विभाग शिक्षक मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार निवडण्याबाबत हालचाली सुरू झाल्या असून, पक्षाच्या शिक्षक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष संतोष दिवटे (वाशिम) किंवा अकोला जिल्ह्यातील माजी आमदार लक्ष्मणराव तायडे यांचे सुपूत्र प्रकाश तायडे यांच्यापैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. त्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरचा मुहूर्त ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सर्वच राजकीय पक्षांनी आतापर्यंत विधान परिषदेच्या विभागीय शिक्षक मतदार संघात थेट उमेदवार देण्याऐवजी पक्षाशी जवळीक असलेल्या संघटना किंवा संस्थांनी उभ्या केलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. यावेळी मात्र काँग्रेसने पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर, उमेदवारांची चाचपणी सुरू झाली आहे. अकोला जिल्ह्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते प्रकाश तायडे यांच्यासोबतच, वाशिम जिल्ह्यातील संतोष दिवटे यांच्या नावावर चर्चा सुरू आहे.