सुटीच्या दिवशी अधिकारी कार्यालयात
By Admin | Updated: March 13, 2017 02:09 IST2017-03-13T01:55:28+5:302017-03-13T02:09:46+5:30
वाशिम नगर परिषद; कर वसुलीसाठी अधिका-यांची मोहीम.

सुटीच्या दिवशी अधिकारी कार्यालयात
वाशिम, दि. १२- नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता विविध प्रकारची कर आकारणी करण्यात येते. मार्च एन्डिंगपर्यंंंत संपूर्ण करवसुली व्हावी याकरिता वाशिम नगर परिषदेतील कर विभागातील अधिकारी कार्यालयात हजर राहून उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत.
गत आठवड्यात वाशिम नगर परिषदेचा २.९६ कोटी रुपयांचा कर शासकीय कार्यालयांकडे थकीत होता. यामध्ये अनेक कार्यालयांकडून थकीत कर वसूल केला असून उर्वरितांकडून केल्या जात आहे. नगर परिषद मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून मार्चच्या आधी संपूर्ण करवसुलीचा निर्धार नगरपालिकेने घेतला असल्याने सुटीच्या दिवशीही कार्यालयात हजर राहून उद्दिष्ट गाठण्याचे मुख्याधिकारी यांनी अधिकारी, कर्मचारी यांना सूचित केल्याने १२ मार्च रोजी वाशिम नगर परिषदमधील कर विभाग जनसेवेत कार्यरत दिसून आला. तर काही कर विभागातील अधिकारी व कर्मचारी वसुलीसाठी रविवारीही थकीत घरगुती ग्राहकांकडे वसुलीसाठी रवाना करण्यात आले असल्याची माहिती कर निरीक्षक अ. अजीज अ. सत्तार, साहेबराव उगले यांनी दिली.
करवसुलीसाठी मुख्याधिकारी गणेश शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली कर निरीक्षक अ. अजीज अ. सत्तार, साहेबराव उगले यांच्या मार्गदर्शनाखाली करसंग्राहक संतोष किरळकर, शिवाजी इंगळे, दत्तात्रय देशपांडे, केशव खोटे, एन.के. मुल्लाजी, संजय काष्टे, आर.एच. बेनिवाले, कुणाल कनोजे, शिपाई एस.एल. खान, अ. वहाब शे. चाँद एम.डी. इळे परिङ्म्रम घेत आहेत.
मार्च महिन्याच्या आत कर विभागातील अधिकारी व कर्मचारी यांना कर वसुलीचे उद्दिष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. माझ्या सूचनेप्रमाणे कर विभागातील सर्व अधिकारी, कर्मचारी प्रामाणिकपणे काम करीत असून मार्च महिन्याच्या शेवटपर्यंंंत थकीतदारांकडील वसुली पूर्ण होईल.
-गणेश शेटे
मुख्याधिकारी, वाशिम नगर परिषद, वाशिम