गत काही महिन्यांपूर्वी अकोला-आर्णी महामार्गाचे अद्ययावतीकरण अंतिम टप्प्यात आले आहे. आता या महामार्गावर वाहने सुसाट धावत आहेत. यामुळे वनोजा फाट्यानजीक अनेक किरकोळ अपघात घडून अनेकजण जखमीही झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. तथापि, येथे वाहनांची प्रतीक्षा करणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. गत चार दिवसांपूर्वी या ठिकाणी प्रवासी उभे असताना मंगरुळपीरकडून सुसाट वेगात येणाऱ्या कारने अगदी प्रवाशांना खेटून ही कार नेली. त्यामुळे तेथे लहान मुलासह उभी असलेली महिला गंभीर जखमी झाली. सुदैवाने जीवितहानी टळली. विशेष म्हणजे या ठिकाणी गजानन महाराजांचे मंदिर आणि लगतच भोलेनाथ महाराज यांचा वृद्धाश्रम, तर जवळच श्री क्षेत्र महादेव मंदिर आहे. त्यामुळे या ठिकाणी भाविकांची नेहमी वर्दळ असते. त्याचबरोबर शिक्षणासाठी विविध ठिकाणांहून प्रवास करणाऱ्या विध्यार्थ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात आहे. तथापि, येथे गतिरोधक तयार करण्यात आले नाही. त्यामुळे रस्ता ओलांडत असताना सुसाट वेगाने वाहनांमुळे अपघात घडून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच येथे तातडीने गतिरोधक तयार करण्याची मागणी प्रवासीवर्गाकडून केली जात आहे.
वनोजा फाटा येथे गतिरोधकांचा अभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST