जामदऱ्याचा सिंचन तलाव हिवाळ्यातच आटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:41 IST2021-01-23T04:41:11+5:302021-01-23T04:41:11+5:30
मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथे जवळपास २५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागांतर्गत सिंचन तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावामुळे ...

जामदऱ्याचा सिंचन तलाव हिवाळ्यातच आटला
मानोरा तालुक्यातील जामदरा घोटी येथे जवळपास २५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागांतर्गत सिंचन तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावामुळे शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले आणि परिसरात रब्बीचे क्षेत्रही वाढले. शेतकऱ्यांना या तलावातून २१ वर्षे मुबलक पाणी मिळाले; परंतु गेल्या चार वर्षांपूर्वी या तलावाच्या भिंतीला तडा गेला. त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरून तलाव हिवाळ्यातच कोरडा पडू लागला आणि तलावाच्या भरवशावर पेरणी केलेली गहू, हरभरा पिके संकटात सापडू लागली. या प्रकारामुळे चार वर्षांपासून शेतकऱ्यांना सतत आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. तलावावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या मानोरा शाखेकडे निवेदन सादर करून दुरुस्तीची मागणीही वारंवार केली; परंतु त्याची दखल न घेतल्याने हा तलाव कोरडा पडत आहे. यंदाही या तलावाच्या भरवशावर पेरलेली शेकडो एकरांतील रब्बी पिके पाण्याअभावी सुकण्याच्या स्थितीत आहेत.
---------------------
दोन वर्षांपासून दुरुस्ती प्रस्तावित, काम मात्र नाही
जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाने जिल्हाभरातील २५ पेक्षा अधिक तलावांचे निरीक्षण करून आवश्यक दुुरुस्तीचे प्रस्ताव तयार केले आहेत. जवळपास ३० कोटी रुपये खर्चाचे हे प्रस्ताव वरिष्ठ स्तरावरही पाठविण्यात आले आहेत. त्यात जामदरा घोटी येथील सिंचन तलावाच्या दुरुस्तीचाही प्रस्ताव समाविष्ट आहे; परंतु दोन वर्षे उलटले तरी प्रस्ताव धूळ खात असून, प्रत्यक्ष दुरुस्तीच्या कामाला सुरुवातही झालेली नाही.
--------
कोट :
गेल्या अनेक वर्षांपासून जामदरा सिंचन तलावाच्या भरवशावर आम्ही रब्बी पिके घेत आहोत; परंतु पाच वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या भिंतीला तडा गेल्याने हा तलाव हिवाळ्यातच कोरडा पडत आहे. या तलावाच्या दुरुस्तीची मागणीही जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाकडे केली; परंतु दखल न घेतल्याने यंदाही हा तलाव आटल्याने आमचे नुकसान होत आहे.
- राजेंद्र धुरट शेतकरी, जामदरा घोटी
===Photopath===
220121\22wsm_3_22012021_35.jpg
===Caption===
जामदऱ्याचा सिंचन तलाव हिवाळ्यातच आटला