अडिच कोटीच्या रस्ता कामात नियमांना बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 17:17 IST2019-06-02T17:16:46+5:302019-06-02T17:17:46+5:30
या कामात नियमांना बगल देण्यात येत असून, निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याने कामाचा दर्जा सुमार होत असल्याचे दिसते.

अडिच कोटीच्या रस्ता कामात नियमांना बगल
लोकमत न्यूज नेटवर्क
पोहा (वाशिम) : कारंजा तालुक्यातील पोहा ते वालई या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने करण्यात येत आहे. तथापि, या कामात नियमांना बगल देण्यात येत असून, निकृष्ट साहित्याचा वापर होत असल्याने कामाचा दर्जा सुमार होत असल्याचे दिसते.
पोहा ते वालई या ५ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे काम करण्यासाठी शासनाकडून मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत २.५० कोटींचा निधी मंजूर झाला. त्यानंतर २९ डिसेंबर २०१८ रोजी आमदार राजेंद्र पाटणी यांच्या हस्ते या रस्ता कामाचे भुमीपुजन करण्यात आले. अंदाजपत्रकानुसार या रस्यासाठी २४७.०७ लाख रुपये खर्च करण्यात येणार असून, या रस्त्याचे काम २० डिसेंबर २०१९ पर्यंत पूर्ण करावयाचे आहे. या रस्ता कामाचे कंत्राट अकोला येथील कंत्राटदाराला देण्यात आले आहे. अंदाजपत्रकानुसार या रस्त्याच्या कामात निर्धारित आकाराची खडी वापरून दबाई करणे आवश्यक आहे; परंतु कंत्राटदार विहिरीच्या खोदकामातून निघालेले निकृष्ट दर्जाचे गौणखनिज या कामासाठी वापरत आहे. यामुळे रस्त्याचा दर्जा सुमार होत असून, दळणवळणाच्या अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यासाठी शासनाने मंजूर केलेल्या निधीचा यामुळे अपव्यय होणार आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाºयांनी रस्ताकामाची नियमित पाहणी करून कंत्राटदाराला रस्त्याचा दर्जा चांगला करण्याबाबत समज देणे अपेक्षीत आहे; परंतु तसा प्रकार येथे होत नसल्याने कंत्राटदार नियमांना बगल देऊनच काम पूर्ण करीत आहे.
रस्ता कामात निकृ ष्ट दर्जाचे गौण खनिज आढळल्यानंतर आम्ही कंत्राटदाराला समज देऊन त्यापैकी काही गौणखनिजाच्या ट्रीप रद्दही केल्या आहेत. अद्यापही नियमांचे पालन होत नसेल, तर कंत्राटदाराला कडक इशारा देऊन काम बंद करण्यात येईल.
-जे. व्ही. कांबळे
कनिष्ठ अभियंता
सा.बां. उपविभाग कारंजा