सिमेंट रस्त्यातील लोखंडी सळय़ा उखडल्या
By Admin | Updated: August 14, 2014 02:06 IST2014-08-14T01:47:49+5:302014-08-14T02:06:00+5:30
मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे शासकीय योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याचे निकृष्ट काम.

सिमेंट रस्त्यातील लोखंडी सळय़ा उखडल्या
शिरपूर जैन :मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे शासकीय योजनेंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्याची अवघ्या काही दिवसांताच पार दैना झाली आहे. निकृष्ठ कामामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत, तसेच लोखंडी सळय़ा उघड्या पडल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना त्रास होत आहे, तर लोखंडी सळय़ांमुळे पादचार्यांना धोका निर्माण झाला आहे. शिरपूर (जैन) येथे साधारण तीन वर्षांपूर्वी शासकीय योजनेंतर्गत जि.प., पं.स. सदस्यांच्या निधीतून ग्रामपंचायत स्तरावर सिमेंट काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले होते.
गावातील गुजरी चौक ते राधेशाम शर्मा यांच्या घरापर्यंत झालेला रस्ता ग्रामस्थांसाठी सोयीचा होता; परंतु अवघ्या काही महिन्यांतच या रस्त्याची अवस्था दयनीय झाली. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून आतील लोखंडी सळय़ा उघड्या पडल्या आहेत.
रस्त्यावरी खड्डे आणि उघड्या पडलेल्या लोखंडी सळय़ांमुळे वाहनधारक आणि पादचार्यांनाही मोठा त्रास होत आहे.
लोखंडी सळय़ांमुळे अनेकदा पादचार्यांच्या पायाला दुखापत होण्याच्या घटनाही घडल्या आहेत. गावातील इतर भागात असलेल्या सिमेंट रस्त्यांचीही हीच अवस्था आहे. ग्रामपंचायत प्रशासनाने या प्रकरणी लक्ष घालून रस्त्याची डागडुजी करावी, अशी मागणी गावकर्यांकडून करण्यात येत आहे.