लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम शहरातील बंडू सौदागर तुपसांडे आणि रामभाऊ खंडजी सांगळे या दोन अवैध सावकारांच्या घर, प्रतिष्ठानांवर जिल्हा उपनिबंधकांच्या तीन पथकांनी ९ जानेवारीला धाडी टाकून अवैध सावकारीचे दस्तावेज जप्त केले. दरम्यान, दोन्ही सावकारांच्या मालमत्तेची सखोल चौकशी केली जाणार असून संबंधितांच्या मालमत्तेची माहिती दुय्यम निबंधक कार्यालयाकडून मागविण्यात आल्याचे जिल्हा उपनिबंधक रमेश कटके यांनी सांगितले. जिल्ह्यात अवैध सावकारीसंदर्भात प्रशासनाला पिडितांच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यानुषंगाने जिल्हाधिकाºयांच्या निर्देशावरून अवैध सावकारांवर कारवाईच्या सूचना जिल्हा उपनिबंधकांनी दिल्या. त्यानुसार, ९ जानेवारी रोजी तीन पथकांनी वाशिम शहरातील रामभाऊ खंडजी सांगळे व बंडू सौदागर तुपसांडे यांच्या घर व प्रतिष्ठाणांवर धाडी टाकल्या. या धाडसत्रात १०५ अपेक्षा अधिक अवैध सावकारीचे दस्तावेज जप्त करण्यात आले. त्यात कोरे धनादेश, खरेदी स्टॅम्प, अवैध सावकारीच्या नोंदी असलेल्या वह्यांचा समावेश आहे. त्याची अंदाजे किंमत १.५ कोटींवर असल्याचे सहकार विभागाच्या प्रथमदर्शनी निदर्शनास आले. दरम्यान, याप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या दस्तावेजांच्या चौकशीसोबतच दुय्यम निबंधक कार्यालयाकडून संबंधित अवैध सावकारांच्या शेती, प्लॉट, घर यासह अन्य स्वरूपातील मालमत्तांची तपासणी केली जाणार असून त्याआधारे संबंधित सावकारांची सुनावणी घेवून पुढील कारवाईची दिशा निश्चित केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक कटके यांनी ‘लोकमत’ला दिली.
‘त्या’ अवैध सावकारांच्या मालमत्तेची होणार चौकशी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2019 13:35 IST