वाशिम जिल्ह्यात घोणस अळीचा शिरकाव; आणखी एकाला चावा
By संतोष वानखडे | Updated: September 19, 2022 14:36 IST2022-09-19T14:36:07+5:302022-09-19T14:36:43+5:30
Washim News: नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता घोणस अळीने नवे संकट उभे केले आहे. घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चिंता वाढली आहे.

वाशिम जिल्ह्यात घोणस अळीचा शिरकाव; आणखी एकाला चावा
- संतोष वानखडे
वाशिम - बहुभक्षीय विषग्रंथी असलेली घोणस अळी (डंख अळी) मंगरूळपीर तालुक्यातील माळशेलू, येडशी येथे रविवारी (दि.१८) आढळल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चिंता वाढली. त्यातच सोमवारी (दि.१९) ईचा (ता.मंगरूळपीर) येथील मारोती भीमराव राऊत (२१) हे शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेले असता त्यांना घोणस अळीने डंख मारल्याने उपचारार्थ दवाखान्यात दाखल करण्यात आले.
नैसर्गिक संकटाचा सामना करीत असलेल्या शेतकऱ्यांसमोर आता घोणस अळीने नवे संकट उभे केले आहे. घोणस अळीचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजुरांची चिंता वाढली आहे. या अळीच्या व्यवस्थापनासाठी नेमक्या कोणत्या किटकनाशकांची शिफारसही नाही; परंतू काही औषध फवारणी करून नियंत्रण मिळविता येते, असे कृषी शास्त्रज्ञांनी सांगितले. ही अळी बहुभक्षीय असून, आधाशाप्रमाणे पानावरील हिरवा भाग खाऊन केवळ शिरा शिल्लक ठेवतात. पावसाच्या परतीच्या काळात उष्ण व आर्द्र हवामानात ही अळी दिसून येते. बांधाच्या गवतावर, एरंडी, आंब्याच्या झाडावर तसेच इतर फळपिकावर या अळीचा मुक्काम असतो. सोयाबीन पिकातही ही अळी आढळत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.
मंगरूळपीर तालुक्यातील येडशी आणि माळशेलू येथे ही अळी आढळल्यानंतर, १९ सप्टेंबर रोजी ईचा येथे शेतात बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या मारोती राऊत या युवकाला या अळीने दंश केला. ही अळी घेवून युवकाला शेलुबाजारच्या आरोग्यवर्धनी केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर या अळीचा हा नविन प्रकार असल्याने कोणत्याही प्रकारची रिस्क न घेता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पुढील उपचारार्थ या युवकाला अकोला येथे जाण्याचा सल्ला दिला.