मोफत ॲडमिशनसाठी आस्तेकदम; सहा दिवसांत एकही प्रवेश नाही
By दिनेश पठाडे | Updated: April 18, 2023 14:02 IST2023-04-18T14:01:55+5:302023-04-18T14:02:05+5:30
शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ९९ शाळांनी नोंदणी केली.

मोफत ॲडमिशनसाठी आस्तेकदम; सहा दिवसांत एकही प्रवेश नाही
वाशिम : आरटीई अंतर्गत मोफत प्रवेशासाठी निवड झालेल्या बालकांच्या पालकांनी ॲडमिशनसाठी आस्तेकदम घेतल्याचे दिसून येत आहे. निवड झालेल्या ७७५ पैकी एकही प्रवेश पहिल्या सहा दिवसांत निश्चित झाला नसल्याचे दिसून येत आहे.
शैक्षणिक वर्षे २०२३-२४ मध्ये आरटीई अंतर्गत जिल्ह्यातील ९९ शाळांनी नोंदणी केली. या शाळांमध्ये ७८६ बालकांना प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेशासाठी २७६६ पालकांनी ऑनलाइन अर्ज दाखल केले. ५ एप्रिल रोजी राज्यस्तरावर सोडत प्रक्रिया राबविण्यात आली. त्यामध्ये ७७५ बालकांची निवड झाली. १२ एप्रिलला आरटीईच्या पोर्टलवर निवड यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पालकांना मेसेज येण्यास प्रारंभ झाला.
बहुतांश पालकांना मेसेज प्राप्त झाला आहे. मात्र संकेतस्थळ स्लो चालत असल्यामुळे अलॉटमेंट लेटर आणि हमी पत्र डाऊनलोड करण्यास अडचण येत आहे. याशिवाय काहींना मेसेज प्राप्त झाले नसल्याने पोर्टलवर खात्री करण्यास देखील तांत्रिक अडथळा निर्माण होत आहे. परिणामी प्रवेश घेता येत नसल्याचे पालकांतून सांगितले जात आहे. त्यामुळे सुरुवातीच्या सहा दिवसांत एकही प्रवेश निश्चित झाला नसल्याचे १८ एप्रिलरोजी पोर्टलवर दिसून आले.
दरम्यान, ऑनलाइन प्रवपेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होत आहे. त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळोन पुन्हा प्रयत्न करावा, प्रवेश पात्र बालकांच्या पालकांनी पडताळणी समितीकडे जाऊन २५ एप्रिलपर्यंत प्रवेश ऑनलाइन निश्चित करावा आणि त्याबाबतची पावती पडताळणी समितीकडून घ्यावी असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.