मानोरा तालुक्यात अवैध वृक्षतोडीस ऊधाण
By Admin | Updated: July 21, 2014 23:22 IST2014-07-21T23:22:41+5:302014-07-21T23:22:41+5:30
माफियांनी वृक्षतोडीचा सपाटा लावल्याने जंगल नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

मानोरा तालुक्यात अवैध वृक्षतोडीस ऊधाण
मानोरा : वनविभागाच्या डोळ्यात धूळफेक करून माफियांनी वृक्षतोडीचा सपाटा लावल्याने 'जंगल' नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान, अवैध वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडला असल्याने त्याचा परिणाम वातावरणात होत आहे. वृक्षतोडीमुळे नैसर्गिक वातावरणात बदल घडण्यास सुरूवात झाली आहे. यापूर्वी अनेक जातीचे वृक्ष पाहायला मिळायचे. पण हल्ली वृक्षतोड, जंगलतोड झाल्यामुळे अनेक झाडे दुर्मिळ झाली आहे. पूर्वी प्रत्येक गावात वटवृक्ष असायचा. या वटवृक्षाची महिला पूजा करायच्या. त्परंतु हल्ली वटवृक्ष गावातून नाहिसे झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे वृटवृक्षाची पूजा करण्याकरिता महिलांनाही कोसो दूर जावे लागत आहे. निंबाचे झाड तर प्रत्येक ऋतूत हिरवेगार दिसून येते. उन्हाळ्यात या झाडाला खूप महत्व दिले जाते. पूर्वी निंबाच्या बिया, पानाचा रस यापासून औषधीसुद्धा तयार होत होती. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात निंबाचे झाड लावत होते. पण निंबाचे झाडही नाहिसे होत आहे. गावालगत जनावरे चरण्यासाठी पडीचा उपयोग करायचे. परंतु सध्या पड दिसेनाशी झाली आहे. जिकडे तिकडे वहितीमधील शेती आढळून येत आहे. त्यामुळे नेहमी हिरवेगार असणारे जंगल सुद्धा आता भकास मिळत आहे. जंगलाची तोड होत असल्यामुळे आता जंगले केवळ शासकीय रेकॉर्डवरच राहते की काय अशी भीती निर्माण झाली आहे.