नवजातांच्या श्रवण चाचणीअभावी कर्णबधिरत्व वैगुण्यात वाढ
By Admin | Updated: September 28, 2015 02:16 IST2015-09-28T02:16:04+5:302015-09-28T02:16:04+5:30
कर्णबधिरतेचा आजार फोफावत असून, यास शासन व पालकांची उदासीनता कारणीभूत.

नवजातांच्या श्रवण चाचणीअभावी कर्णबधिरत्व वैगुण्यात वाढ
वाशिम : अपत्याचा जन्म होताच चाचण्या न केल्याने कर्णबधिरतेचा आजार फोफावत असून, याला शासन व पालकांची उदासीनता कारणीभूत असल्याचा आरोप कर्णबधिरांच्या उत्थानासाठी झटणार्या स्वयंसेवी संस्थांनी केला आहे. कर्णबधिरत्व हे अदृश्य व दुहेरी अपंगत्व आहे. देशात २.१ टक्के लोक या आजाराने ग्रासले आहेत. हा आजार चार प्रकारचा असतो. यामध्ये सौम्य, मध्यम, तीव्र व अतितीव्र कर्णबधिरत्व हे चार प्रकार आहेत. जन्मताच अपत्य कर्णबधिर आहे का, याची चाचणी झाली, तर त्वरित उपाय करता येतात व त्यामुळे बहुतांश मुलांमधून हा दोष नाहीसा होऊ शकतो; मात्र अशाप्रकारची तपासणी केली जात नाही. मूल दोन ते तीन वर्षांचे झाल्यावर पालकांना ते कर्णबधिर असल्याची माहिती मिळते. त्यानंतर त्यांच्यावर योग्य उपचारही करण्यात येत नाहीत. याबाबत माहिती देताना अकोला येथील एकवीरा फाउंडेशनचे श्रीकांत बनसोड यांनी सांगितले, की जन्माला आलेले अपत्य कर्णबधिर असल्याचे तीन महिन्यांच्या आत समजले, तर त्यावर उपचार होऊ शकतात; मात्र मुलं मोठी झाल्यावर उपचार करणे कठीण होते. जिल्ह्यात उपचार केंद्र नाहीत वाशिम जिल्ह्यात कर्णबधिर मुलांवर उपचार करणारे केंद्रच नाहीत तसेच कर्णबधिरांना शिक्षण देणार्या शाळाही नाहीत. त्यामुळे अशा मुलांवर उपचार करण्यासाठी पुणे किंवा मुंबई येथे पाठवावे लागते तसेच या मुलांना शिक्षण देण्यासाठीही मोठय़ा शहरांमध्येच पाठवावे लागते. अनसिंग येथे कर्णबधिरांची एक शाळा असून, तेथे केवळ आठवीपर्यंंत शिक्षण दिले जाते.