आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 16:56 IST2018-08-11T16:54:45+5:302018-08-11T16:56:18+5:30
आसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पुरती दुरवस्था झाली आहे.

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची दुरवस्था
लोकमत न्यूज नेटवर्क
आसेगाव (वाशिम) : नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी असलेल्या आसेगाव येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रांतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांची पुरती दुरवस्था झाली आहे. याशिवाय अन्य सोयी-सुविधांचा देखील अभाव असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर उमटत आहे.
आसेगाव येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कार्यान्वित असून नजिकच्या १५ ते २० खेड्यांमधील रुग्ण याठिकाणी दैनंदिन उपचारासाठी येतात. त्यापैकी काही रुग्ण गंभीर अवस्थेत असतात; तर गर्भवती मातांवरही या रुग्णालयात उपचार केले जातात. असे असताना रुग्णालयात रुग्णांची सोय व्हावी, यादृष्टीने अनेक सुविधा अद्याप पोहचलेल्या नाहीत. दुसरीकडे प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांचीही मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या निवासस्थानांची रंगरंगोटी झालेली नाही. निवासस्थान परिसरात सदोदित कचरा साचून असतो. यासह पावसाळ्यात निरूपयोगी झाडे, गवत उगवते. त्यामुळे विषारी सापांचा देखील वावर वाढतो. एकूणच या सर्व समस्यांमुळे निवासस्थानांमध्ये वास्तव्य करणारे आरोग्य कर्मचारी पुरते वैतागले आहेत. आरोग्य विभागातील वरिष्ठांनी याकडे लक्ष पुरवून किमान सोयी-सुविधा पुरविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.