संत्रा पिकावरील प्रमुख कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:45 IST2021-01-13T05:45:11+5:302021-01-13T05:45:11+5:30
कीटकशास्रज्ञ राजेश डवरे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत संत्रा पिकावर कोणत्या किडीचा कोणत्या महिन्यात प्रादुर्भाव होतो, त्या किडीची ओळख ...

संत्रा पिकावरील प्रमुख कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन
कीटकशास्रज्ञ राजेश डवरे यांनी सुरू केलेल्या या उपक्रमांतर्गत संत्रा पिकावर कोणत्या किडीचा कोणत्या महिन्यात प्रादुर्भाव होतो, त्या किडीची ओळख आणि त्यामुळे पिकांचे होणारे नुकसानासह या किडीवर नियंत्रण मिळवून उत्पादनात वाढ कशी करता येईल, यासंदर्भातही मार्गदर्शन करण्यात येत आहे.
संत्र्यावरील प्रमुख किडी व व्यवस्थापन
(१) काळी/पांढरी माशी : या किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी तेल १०० ते १२५ मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. निंबोळी तेल पाण्यात मिसळण्यासाठी प्रथम १०० मिली निंबोळी तेलात दहा ग्रॅम किंवा १२५ मिली निंबोळी तेलात १२.५ ग्रॅम डिटर्जंट पावडर किंवा १२.५ मिली टीपोल मिसळावे.
(२) सायट्रस सिला : या किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी तेल १०० मिली अधिक दहा लिटर पाणी दहा लिटर पाणी या प्रमाणात मिसळून १५ दिवसांच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात. निंबोळी तेल पाण्यात मिसळत नसल्यामुळे १० ग्रॅम डिटर्जंट पावडर प्रति १०० मिली निंबोळी तेलात मिसळावी.
(३) पाने पोखरणारी अळी : या किडीच्या व्यवस्थापनासाठी निंबोळी तेल १०० मिली अधिक १० लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
(४) पाने खाणारी अळी : या किडीच्या व्यवस्थापनासाठी क्विनॉलफॉस २५ टक्के प्रवाही २० ते ३० मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन फवारणी करावी.
(५) साल खाणारी अळी : या किडीच्या व्यवस्थापनासाठी अळीच्या विष्ठेची जाळी काढून साल पोखरणाऱ्या अळीचे छिद्र मोकळे करावे. नंतर त्यात पेट्रोल किंवा केरोसीन पिचकारीच्या साह्याने अथवा ऑइल कॅनच्या साह्याने छिद्रात टाकून ते ओल्या मातीने बंद करावे.
(६) रस शोषक पतंग : या किडीच्या व्यवस्थापनासाठी गळलेली, सडलेली फळे जमा करून नष्ट करावीत, बागेभोवती असलेल्या तणांचा नाश करावा, सायंकाळी सहा ते आठ या वेळेत संत्राबागेत धूर करावा, या किडीचा प्रादुर्भाव दिसताच पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.
(७) संत्रावरील कोळी : या किडीच्या व्यवस्थापनासाठी डायकोफॉल १८.५ टक्के प्रवाही २७ मिली अधिक दहा लिटर पाणी या प्रमाणात घेऊन पहिली फवारणी फळ विकसित होण्याच्या अवस्थेत, तर दुसरी फवारणी एक महिन्याने करावी, तसेच पाच टक्के निंबोळी अर्काची महिनाभराच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.