सोयाबिनच्या कोवळ्या पानांवर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 16:14 IST2019-07-28T16:14:45+5:302019-07-28T16:14:49+5:30
विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवरील काही गावांमधील सोयाबिनवर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे.

सोयाबिनच्या कोवळ्या पानांवर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव!
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : गेल्या चार ते पाच दिवसांपासून जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होत असल्याने खरीप हंगामातील प्रमुख पीक असलेले सोयाबिन चांगलेच बहरले आहे; मात्र कोवळ्या पानांवर किटकांचे संकट घोंगावणे सुरू झाले असून विदर्भ-मराठवाड्याच्या सिमेवरील काही गावांमधील सोयाबिनवर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळले आहे. त्यापासून बचावासाठी शेतकºयांनी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले.
चालू हंगामात पावसाने विलंबाने हजेरी लावल्याने खरीपाची पिके संकटात सापडली होती; मात्र गेल्या चार ते पाच दिवसांपासून सार्वत्रिक स्वरूपाचा पाऊस होत असल्याने पिकांना संजीवनी मिळण्यासोबतच शेतकºयांवर घोंगावणारे दुबार पेरणीचे संकटही टळले आहे. असे असले तरी दरवर्षीप्रमाणे यंदाही सोयाबिन पिकावर हिरव्या उंटअळीचा प्रादुर्भाव झाल्याचे निदर्शनास येत असून मराठवाडा-विदर्भाच्या सिमेवरील राजगाव, अटकळी, अडोळी, टो, जुमडा आदी गावांमधील पिकांवर अळ्या आढळून आल्या आहेत. तथापि, प्राथमिक टप्प्यात उद्भवलेला हा धोका टाळण्यासाठी शेतकºयांनी पिकावर पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. प्रमाण वाढल्यास कृषी विभागाच्या सल्लयानुसार किटकनाशकांची फवारणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.