'रोहयो'मधून ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालयही साकारणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2020 17:54 IST2020-08-07T17:54:19+5:302020-08-07T17:54:37+5:30
या कामांचा सन २०२०-२१ च्या पुरक लेबर बजेटमध्ये समावेश करण्याच्या सूचना नियोजन विभागाने (रोहयो) ५ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या.

'रोहयो'मधून ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालयही साकारणार!
वाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत यापूर्वी मंजूर नसलेली काही नवीन कामेही आता घेता येणार आहेत. यामध्ये ग्राम पंचायत भवन आणि सार्वजनिक शौचालय बांधकामावा समावेश केला असून, या कामांचा सन २०२०-२१ च्या पुरक लेबर बजेटमध्ये समावेश करण्याच्या सूचना नियोजन विभागाने (रोहयो) ५ आॅगस्ट रोजी जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्ह्यांमध्ये सन २००५ पासून केली जात आहे. मागेल त्याला काम उपलब्ध करून देणे, या कामातून सामुहिक तसेच वैयक्तिक पायाभूत सुविधा उपलब्ध करणे आदी प्रमुख उद्दिष्टे या योजनेतून साध्य करण्याला प्राधान्य दिले जाते. सन २०२१-२२ या वर्षातील लेबर बजेट तयार केले जाणार आहे. या बजेटमध्ये यापूर्वी मंजूर नसलेली; परंतू आता घेण्यासारख्या कामांचा समावेश करता येणार आहे. ग्रामीण भागात अनेक ग्रामपंचायतींना स्वत:ची इमारत नाही. अशा ग्रामपंचायतींचा कारभार भाडेतत्वावरील इमारतीत सुरू आहे तसेच जास्त लोकसंख्येच्या गावात सार्वजनिक शौचालयाचा अभाव आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत जेथे आवश्यकता असेल तेथे ग्रामपंचायत भवन तसेच सार्वजनिक शौचालय बांधकामाचा समावेशही करता येणार आहे. सन २०२०-२१ चे पूरक बजेट तयार करताना आवश्यक तेथे ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालय बांधकामाचा समावेश करण्याच्या सूचना नियोजन विभागाने (रोहयो) जिल्हास्तरीय यंत्रणेला दिल्या. त्यानुसार अमरावती विभागात ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालय बांधकामाचा समावेश २०२०-२१ च्या पुरक बजेटमध्ये करावा, अशा सूचना ग्रामपंचायतींना देण्यात आल्या. वाशिम जिल्ह्यातही पुरक बजेटमध्ये आवश्यकतेनुसार ग्रामपंचायत भवन, सार्वजनिक शौचालय बांधकामाचा समावेश केला जाणार आहे.