गावरान आंबा हद्दपार !

By Admin | Updated: May 12, 2014 23:20 IST2014-05-12T23:11:52+5:302014-05-12T23:20:42+5:30

रसाळीही दुर्मीळ झाली आहे.

Gavran Mango Exile! | गावरान आंबा हद्दपार !

गावरान आंबा हद्दपार !

वाशिम : उन्हाळा आला की, आठवण होते ती आंब्याची! हा आंबा म्हणजे आजच्या मार्केटिंगच्या युगातील एक्सपोर्ट केलेला आंबा नव्हे तर गावरान आंब्याची. मात्र हा गावरान आंबा आज हद्दपार झाल्याचे चित्र असून, रसाळीही दुर्मीळ झाली आहे. पूर्वी उन्हाळ्यात पाहुण्यासाठी खास आंब्याच्या रसाचा पाहुणचार व्हायचा, सकाळी न्याहारीसाठी आंबा, दुपारच्या जेवणाबरोबरही आंबा असायचा. त्याला कारणही तसेच होते. प्रत्येकाच्या शेतात एकतरी आंब्याचे झाड असायचे तर प्रत्येक गावात चारासह आमराई (एकाच शेतात आंब्याची अनेक झाडे ) असायच्या. या आमराईमुळे गावात घराघरांत आंबे असायचे. ज्यांच्याकडे शेती नाही अशा शेतमजुरांची घरेसुद्धा आंब्यांनी भरलेली असायची. वेगवेगळ्या चवीच्या या रसभरित आंब्यामुळे ग्रामीण भागात चंगळ असायची. पाहुण्यांसाठी हमखास आमरस असायचा. नववधू किंवा नवीन जावई बापूंना आंब्याचा रस, कांद्याची भाजी व घरी तयार केलेल्या खारुडी, कुरडईचा पाहुणचार म्हणजे खाणारा खूश व खाऊ घालणाराही खूश. मात्र, अलीकडे गावरान आंबा दुर्मीळ होत चाललाय. आमराई नष्ट झाल्या, बाजारात गावरान आंबा दिसेनासा झाला. त्यामुळे गावरान आंब्याची चवही दुर्मीळ झाली. आज मार्केटिंगचा जमाना आहे. वेगवेगळ्या ठिकाणाहून बाजारात आंबा येतो. या आंब्याला कृत्रिमरीत्या पिकवून पिवळा केल्या जाते. मात्र, गावरान आंब्याची चव त्याला मुळीच नसते. गावरान आंबे का नष्ट झाले. ग्रामीण भागात आंब्याच्या झाडांची संख्या थोड्या बहुत प्रमाणात आजही आहे. पण आंब्याला फुलोरा येण्यास सुरुवात होते त्यावेळीच आभाळ आणि वातावरण बदलीमुळे तो जळतो. लहान कैरी असल्याने वानरांना जंगलात खाण्यासाठी एकमेव कैरीच असते. वार्‍या वादळाने आंब्याचा फुलोरा व छोट्या कैर्‍या पडतात. पर्यायाने आंब्याच्या उत्पन्नात घट होत आहे.पूर्वी आंब्याच्या खाल्लेल्या कोयासुद्धा फायद्याच्या ठरत. चांगल्या आंब्याच्या कोया जपून ठेवल्या जात होत्या. मग घरीच पिकलेल्या आंब्याच्या झाडाची रोपे मोठी करून शेतात पावसाळ्यात लावत. त्याला संरक्षण देत व योग्य ती काळजी घेतली जाई. आंबा पिकविण्यासाठी गवत पेरत त्या गवतात कैर्‍या झाकल्या जायाच्या. आंबे पिकविण्यासाठी मोठ-मोठे गोठे, गोडावून असत. त्यामध्ये आंबे पिकवल्या जायचे. आज गोडावूनही दिसत नाही व आंबेही.

Web Title: Gavran Mango Exile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.