गावरान आंबा कृषी विभागाच्या कागदावरून गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2015 01:44 IST2015-04-17T01:44:44+5:302015-04-17T01:44:44+5:30
आंब्याचे ‘अवकाळी’ नुकसान : मदतीची आशा धूसर

गावरान आंबा कृषी विभागाच्या कागदावरून गायब
संतोष वानखडे /वाशिम: शेतातील धुरा आणि पाणंद रस्त्यालगत हमखास आढळणार्या गावरान आंब्याच्या झाडांची नोंद कृषी विभागाकडे नसल्याची माहिती समोर येत आहे. नोंद नसल्यामुळे गावरान आंब्याच्या नुकसानाची भरपाई मिळण्याची आशाही धूसर बनली आहे. जानेवारी महिन्यापासून अवकाळी पाऊस, गारपीट आणि वादळी वार्याची मालिका सुरू आहे. याचा फटका रब्बी पिके, फळबागा व भाजीपालावर्गीय पिकांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. वादळी वार्यामुळे फेब्रुवारी महिन्यात आंब्यांच्या मोहराला मोठय़ा प्रमाणात फटका बसला होता. एप्रिल महिन्याच्या दुसर्या आठवड्यात अवकाळी पाऊस आणि वादळी वार्यामुळे पश्चिम वर्हाडातील आंब्याचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. फळबाग योजनेंतर्गत लागवड केलेल्या उत् पादनक्षम आंब्याची नुकसानभरपाई काही प्रमाणात शेतकर्यांना मिळू शकेल; मात्र शेताच्या धुर्यावर व पाणंद रस्त्यालगत असलेल्या गावरान आंब्याची कृषी विभागाकडे नोंदच नसल्यामुळे भरपाई कशी मिळणार, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. फळबाग योजनेंतर्गत वाशिम जिल्ह्यात नऊ हेक्टर, अकोला जिल्ह्यात २१ हेक्टर, तर बुलडाणा जिल्ह्यात ३२ हेक्टर क्षेत्रावर विविध जातीचा आंबा असल्याची नोंद आहे. गावरान आंबा किती क्षेत्रफळावर आहे, याची नोंद कृषी विभागाकडे नाही. वादळी वार्यामुळे गावरान आंब्यासह सर्व जातीच्या आंब्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गावरान आंबा कमी असल्यामुळे रसाळीचा गोडवा महागणार, यात शंका नाही.