उद्याने झाली भकास; स्वराज्य संस्था करेनात विकास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST2021-09-27T04:45:27+5:302021-09-27T04:45:27+5:30
वाशिम शहराच्या मध्यभागी नगर परिषदेने लोकमान्य टिळक उद्यानाची निर्मिती केली. यात सन १९८५ साली तत्कालीन खासदार गुलाम नबी ...

उद्याने झाली भकास; स्वराज्य संस्था करेनात विकास
वाशिम शहराच्या मध्यभागी नगर परिषदेने लोकमान्य टिळक उद्यानाची निर्मिती केली. यात सन १९८५ साली तत्कालीन खासदार गुलाम नबी आझाद यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले; परंतु दुर्लक्ष होत असल्याने हे उद्यान भकास झाले आहे. कारंजा पालिकेनेही १९८५ मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष शशिकांत चवरे यांच्या कार्यकाळात भगवान महावीर उद्यान विकसित केले. चार एकर जागेतील या उद्यानात आकर्षक फुलझाडे, लहान बालकांसाठी घसरगुंडी, कारंजी, खेळणी, नागरिकांना बसण्याची व्यवस्था होती. या उद्यानाची देखभाल झाली नाही. परिणामी तेही भकास झाले असून, हे उद्यान तर गुरे चराईचे गायरानच बनले आहे. मंगरुळपीर शहरातही नगर परिषदेने महात्मा फुले उद्यानाच्या निर्मितीला १९९० च्या दशकात सुरुवात केली; परंतु अंतर्गत रस्ते आणि कुंपण भिंतीच्या पुढे या उद्यानाचे काम आजवरही गेलेच नाही. सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून येथे वृक्ष लागवड करण्यात आली आहे.
००००००००००००००००
तीन शहरांत सुविधाच नाही
वाशिम, कारंजा आणि मंगरुळपीर पालिकेने अस्तित्वात असलेल्या उद्यानांची दखल घेतली नाहीच, तर मालेगाव, मानोरा आणि रिसोड शहरांत स्थानिक स्वराज्य संस्थांनी ही सुविधाच उपलब्ध केली नाही. त्यामुळे स्वराज्य संस्थांच्या मानसिकतेची प्रचिती येते.
०००००००००००००००
नवे पर्यायही नाहीत
एकीकडे शहरात अस्तित्वात असलेल्या उद्यानांची देखभाल स्थानिक स्वराज्य संस्थांनी न केल्याने त्यांची दुरवस्था झाली आहे, तर दुसरे कोणते पर्यायही जनतेच्या विरंगुळ्यासाठी कोणत्याच शहरातील स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध करण्याची तसदीही अद्याप घेतली नाही.
००००००००००
वाशिमच्या टेम्पल गार्डनचे काम चौकशीच्या कचाट्यात
वाशिम शहरातील लोकमान्य टिळक उद्यानाचा विकास पालिकेला करता आला नाहीच उलट शहरातील नागरिकांसाठी प्रस्तावित केलेले आणि अर्धवटच असलेले टेम्पल गार्डनचे कामही चौकशीच्या कचाट्यात सापडले आहे.
००००००००००००००००
कोट: महावीर उद्यानाची दुरुस्ती किंवा त्यातील साधनांची डागडुजी हा विषय आता शक्यच नाही. त्यामुळे या उद्यानाची हरितपट्टा योजनेतून पुनर्निर्मितीच करण्यात येणार आहे. आमदार राजेंद्र पाटणी यांनी कुंपणासाठी १३ लाखांचा निधीही मंजूर केला असून, इतर कामांसाठी आणखी ६४ लाख रुपये निधी खर्च होईल.
- दादाराव डोल्हारकर,
मुख्याधिकारी, कारंजा
०००००००००००
कोट: लोकमान्य टिळक उद्यानाच्या विकासाबाबत अद्याप कोणता प्रस्ताव नाही. तथापि, या जागेत सोयी-सुविधा उपलब्ध करण्याचा मानस आहे. शिवाय शहराच्या मध्यवर्ती भागातच टेम्पल गार्डनसह इतर सोयी-सुविधांचे कामही सुरू आहे. ही कामे लवकरच पूर्ण केली जातील.
- दीपक मोरे,
मुख्याधिकारी, वाशिम