‘सोशल मीडिया’वर फिरताहेत फसव्या ‘पोस्ट’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 05:15 IST2021-03-13T05:15:36+5:302021-03-13T05:15:36+5:30
१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० या वयोगटांतील कर्त्या व्यक्तीचे निधन ...

‘सोशल मीडिया’वर फिरताहेत फसव्या ‘पोस्ट’!
१ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत ज्या घरातील २१ ते ७० या वयोगटांतील कर्त्या व्यक्तीचे निधन झाले, त्या व्यक्तीच्या विधवेला महिला व बाल विकास विभागाकडून राबविण्यात येणाऱ्या जिजामाता/जिजाऊ या योजनेअंतर्गत ५० हजार रुपये मदत मिळणार असल्याची पोस्ट ‘व्हाॅट्स-अॅप’वर वेगाने फिरत आहे; मात्र हा संदेश हा पूर्णत: चुकीचा व बनावट असून, अशी कुठलीच योजना विभागामार्फत कार्यान्वित नाही, असे महिला व बाल विकास विभागाच्या उपायुक्तांनी १० मार्च रोजी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांना पत्राव्दारे अवगत केले आहे. सोबतच वेगाने ‘व्हायरल’ होत असलेल्या अशाप्रकारच्या संदेशांमुळे नागरिकांची फसवणूक होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे युद्धस्तरावर जनजागृती करण्यात यावी, अशा सूचना उपायुक्तांनी दिल्या आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील नागरिकांनी अशा स्वरूपातील फसव्या संदेशांना बळी पडून कुठलाही आर्थिक व्यवहार करू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांनी केले आहे.