शेलुबाजार येथील एटीएममधून निघताहेत जीर्ण, फाटक्या नोटा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 02:09 PM2019-05-03T14:09:32+5:302019-05-03T15:03:56+5:30

शेलुबाजार येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क फाटक्या, जीर्ण झालेल्या आणि रंग चढलेल्या नोटा निघत आहेत.

Fragile, dirty notes coming from ATMs in Shelu Bujar | शेलुबाजार येथील एटीएममधून निघताहेत जीर्ण, फाटक्या नोटा

शेलुबाजार येथील एटीएममधून निघताहेत जीर्ण, फाटक्या नोटा

Next

शेलुबाजार (वाशिम): ग्राहकांची कुठल्याही कामासाठी पैशांची अडचण वेळीअवेळी दूर व्हावी म्हणून विविध बँकांनी एटीएम सेवा सुरू केली; या एटीएममधून सुव्यवस्थीत चलनी नोटा निघणे आवश्यक आहे; परंतु शेलुबाजार येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून चक्क फाटक्या, जीर्ण झालेल्या आणि रंग चढलेल्या नोटा निघत आहेत. या नोटा व्यवहारांत कोणीही स्विकारणे अशक्य असल्याने खातेदारांच्या अडचणीत अधिकच भर पडत आहे.
विविध बँकेच्या खातेदारांना वेळेवर रक्कम काढून आपली तातडीची अडचण दूर करण्यासाठी बँकांनी एटीएम सेवा सुरू केली. ही सेवा देत असताना निर्धारित विड्रॉल संख्येच्या मर्यादेनंतर खातेदारांकडून शुल्कही वसुल करण्यात येते. पहिल्या पाच विड्रॉलनंतर खातेदाराने त्याचे खाते असलेल्या बँकेच्या एटीएम व्यतीरिक्त इतर बँकेच्या एटीएममधून रक्कम काढल्यास हे शुल्क वसुल केले जाते. या एटीएमची सुरक्षा आणि त्यात रक्कम टाकण्याचे कंत्राट किंवा जबाबदारी बँकांनी विविध कंपन्यांकडे दिली आहे. या कंपन्यांना त्याद्वारे चांगले उत्पन्नही मिळते. त्यामुळे त्यांनी एटीएमधारकांना चांगली सेवा देणे अपेक्षीत आहे. तथापि, असे होताना दिसत नाही. अनेकदा एटीएममध्ये रक्कमच नसते, तर आता एक नवाच प्रकार शेलुबाजार येथील एटीएमधारकांना अनुभवायला मिळत आहे. शेलुबाजार येथील मुख्य चौकात स्टेट बँकेचे एटीएम केंद्र असून, यातील एटीएममशीनमधून ग्राहकांना चक्क जीर्ण झालेल्या, फाटक्या, रंग लागलेल्या, कागद चिकटलेल्या नोटा मिळत आहेत. विशेष म्हणजे हा प्रकार ५०० रुपयांच्या नोटेबाबतच घडत आहे. या नोटा व्यवहारात कोणीही स्विकारण्यास तयार नाही. त्यामुळे अतिशय अडचणीच्या वेळी एटीएमचा आधार घेणाºया एटीएम कार्डधारकांची मोठी पंचाईत झाली आहे.  मंगळवारी या प्रकारामुळे चिडलेल्या एका खातेदाराने थेट एटीएम मशीन फोडण्याचाच निर्धार केला; परंतु तेथे उपस्थित ग्रामस्थ, व्यावसायिकांनी त्याची समजूत काढून शांत केले. दरम्यान, काही ग्राहकांनी याबाबत स्टेट बँकेच्या मंगरुळपीर शाखा व्यवस्थापकांशी संपर्क साधून त्यांना माहिती दिली. त्यावेळी त्यांनी संबंधितांना बोलावून त्यांच्या नोटा बदलून दिल्या आणि याबाबत संबंधित कंपनीला विचारणा करण्याचेही आश्वासन दिले.

एटीएम शुल्कासह नोटा बदलण्याचाही भुर्दंड
शेलुबाजार येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून निकामी नोटा निघत असल्याने संबंधित कार्डधारकांची पंचाईत झाली. त्यांना त्या बदलून देण्याची तयारीही मंगरुळपीर शाखेने दर्शविली; परंतु एटीएममधून रक्कम काढताना आधीच शुल्काचा भुर्दंड भरल्यानंतर त्यांना शेलुबाजार येथून मंगरुळपीरला खर्च करून जाण्याचा भुर्दंडही सोसावा लागत आहे. त्यातच यासाठी जवळपास अर्ध्या दिवसाचा वेळ खर्च करावा लागत असल्याने शेलुबाजारचे एटीएम काय कामाचे, असा प्रश्न खातेदार उपस्थित करीत होते.

Web Title: Fragile, dirty notes coming from ATMs in Shelu Bujar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.