वन परिसरातील सौर कुंपण योजना अडकली लालफितशाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 16:19 IST2021-02-16T16:04:13+5:302021-02-16T16:19:25+5:30
Washim News सौर कुंपण योजना मृगजळ तर ठरणार नाही ना? अशी भीतीही शेतकºयांमधून वर्तविण्यात येत आहे.

वन परिसरातील सौर कुंपण योजना अडकली लालफितशाहीत
वाशिम : वन्यप्राण्यांकडून होणारे पीक नुकसान टाळण्यासाठी वनपरिसरात सौर कुंपण योजना अंमलात आणण्याची तयारी राज्य शासनाने केली खरी; परंतू दीड महिन्यानंतरही जिल्ह्यातील आराखड्यांना शासनाकडून मंजूरी मिळाली नाही. सौर कुंपण योजना मृगजळ तर ठरणार नाही ना? अशी भीतीही शेतकºयांमधून वर्तविण्यात येत आहे.
वन्यप्राण्यांकडून होणारे पीक नुकसान आणि यातून घडत असलेला मानव-वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी जंगली भागातील शेती सौर कुंपनाने संरक्षित करण्यासाठी शासनाने डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनविकास योजनेंतर्गत शिव पिक संरक्षण योजना राबविण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेतला. या योजनेत गोंदिया, नागपूर, अमरावती, वाशिम, यवतमाळ यासह अन्य जिल्ह्यांचा समावेश आहे. शिव पीक संरक्षण योजनेंतर्गत सौर कुंपण योजनेचे प्रारूप तयार करण्यासाठी शासनाने वनालगत शेती असणाºया शेतकºयांकडून अभिप्राय मागविण्यासह वन्यप्राण्यांमुळे सर्वाधिक पीक नुकसान होणाºया गावांची यादी तयार करण्याच्या सूचना वनविभागाला दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही तालुक्यातील प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकाºयांनी शेतकºयांची बैठक बोलावून यासंदर्भातील कृती आराखडा तयार केला. संवेदनशील असलेल्या वनपरिक्षेत्राच्या सीमेपासून ५ किलोमीटर अंतरात असलेल्या गावांत सामूहिक जाळीचे कुंपण या योजनेंतर्गत तयार करण्याचे नियोजित असून, तसा आराखडा वनविभागाने शासनाकडे सादर केलेला आहे. दीड महिना उलटून गेला तरी या आराखड्याला शासनाकडून मंजूरी मिळू शकली नाही. त्यामुळे पुढील कार्यवाही थांबली आहे.