आठवडाभर ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवणारे माकड अखेर जेरबंद
By दादाराव गायकवाड | Updated: September 27, 2022 19:02 IST2022-09-27T19:02:02+5:302022-09-27T19:02:28+5:30
आठवडाभर ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवणारे माकड अखेर जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले.

आठवडाभर ग्रामस्थांमध्ये दहशत पसरवणारे माकड अखेर जेरबंद
वाशिम : जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्याच्या वनोजा येथे गेल्या आठवडाभरापासून एका लालतोंड्या माकडाने उच्छाद मांडून ग्रामस्थांत दहशत निर्माण केली होती. अखेर मंगळवारी २७ सप्टेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास वनविभागाच्या अमरावती येथील रॅपिड रिस्पॉन्स युनिटचे अमोल गावनेर यांनी या माकडाला बेशुद्ध करून पिंजऱ्यात कैद केले.
मागील आठवडाभरापासून वनोजा येथे माकडांच्या कळपासह एक लालतोंड्या माकडही गावात आले होते. त्याने गावात उच्छाद मांडत घरात घुसून खाद्यपदार्थ पळविणे, महिलांच्या लहान मुलांच्या अंगावर धावून जाणे नागरिकांव हल्ले करण्याचा प्रकार सुरू केला होता. त्यामुळे गावात दहशत पसरली होती. गावकऱ्यांनी कारंजा-मंगरुळपीरचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानंतर वनविभाग व वनोजा येथील साळुंकाबाई राऊत महाविद्यालयाच्या रासेयो आपत्ती व्यवस्थापन पथकाने या माकडाला पकडण्याचे अथक प्रयत्न केले. परंतु हे प्रयत्न विफल ठरले.
अखेर वनविभाग वाशिमचे उपवनसंरक्षक तसेच कारंजा-मंगरुळपीर वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित शिंदे यांनी अमरावती येथील रॅपिड रिस्पॉन्स युनिटला पाचारण केले. या या युनिटचे शुटर व वनपाल अमोल गावनेर यांनी ३ तासाच्या ऑपरेशननंतर शेलुबाजार येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या समक्ष त्या माकडाला बंदुकीच्या आधारे ट्रँक्युलाईज करून पिंजऱ्यात टाकले. आता या माकडाची वैद्यकीय तपासणी करून त्याला निसर्ग अधिवासात मुक्त करण्यात येणार आहे.