दहा वर्षांपासून तलावाचे काम रखडले; कास्तकार उपोषणास बसले
By दिनेश पठाडे | Updated: April 10, 2023 15:00 IST2023-04-10T15:00:03+5:302023-04-10T15:00:24+5:30
साठवण तलावाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार निवेदनातून प्रशासनाकडे केली.

दहा वर्षांपासून तलावाचे काम रखडले; कास्तकार उपोषणास बसले
वाशिम : मंगरुळपीर तालुक्यातील ग्राम निंबी येथील साठवण तलावाचे काम दहा वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. वारंवार मागणी करुनही काम पूर्ण करण्यात आले नसल्याने कास्तकारांनी सोमवार(दि.१०)पासून जिल्हा कचेरी समोर उपोषण आरंभले आहे.
उपोषणार्थींनी दिलेल्या निवेदनात म्हटले की, निंबी येथील लघू पाटबंधारे साठवण तलावामुळे हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येऊन शेतकऱ्यांना फायदेशीर ठरेल, अशी अपेक्षा होती. मात्र, ती फोल ठरली असून काम पूर्ण न झाल्याने शेतजमीन सिंचनाखाली आली नाही. परिणामी शेतकऱ्यांना कोरडवाहू जमिनच कसावी लागत आहे. सदर साठवण तलावाची भिंत अर्धवट स्थितीत असल्याने तलावात पाणी साठवून राहत नाही. त्यामुळे या साठवण तलावातील पाण्याचा शेतकऱ्यांना कोणताही उपयोग होत नसल्याचे चित्र आहे. त्यांना एकच पीक घ्यावे लागत असल्याने आर्थिक उत्पन्न वाढत नाही.
ही बाब लक्षात घेऊन साठवण तलावाचे काम पूर्ण करण्यासंदर्भात संबंधितांना सूचना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांनी वारंवार निवेदनातून प्रशासनाकडे केली. मात्र त्याची दखल न घेतल्यामुळे अखेर आमरण उपोषण करण्याचा मार्ग अवलंबिला असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले. जोपर्यंत काम चालू होत नाही, तोपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा निर्धार उपोषणकर्ते बबन टोपले, डिगांबर टोपले, वसुदेव हातोळकर, दिलीप चव्हाण, विलास मनवर, अनील जाधव, कृष्णा चव्हाण आदींनी केला आहे.